चिपी विमानतळ आंतरराष्ट्रीय होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

हेलिकॉप्टर सेवा सुरु केल्यास कोकणातील सौंदर्याचे हवाई सफरद्वारे आनंद घेता येईल

uddhav thackeray assurance we take efforts to make chipi airport international
चीपी विमानतळ आंतरराष्ट्रीय होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. चिपी विमानतळाच्या उद्घाटनामुळे कोकणची संपन्नता आता जगासमोर येणार आहे. पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. चिपी विमानतळामुळे कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण झाले असून खर्याअर्थाने कोकणच्या विकासाने भरारी घेतली आहे. चिपी विमानतळ आंतरराष्ट्रीय होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही आवाहन केलं आहे. हेलिकॉप्टर सेवा सुरु केल्यास कोकणातील सौंदर्याचे हवाई सफरद्वारे आनंद घेता येईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं असून यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी म्हटलं आहे की, गेल्या अनेक वर्षापासून कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण झाले, याचा आनंद झाला आहे. या विमानतळामुळे जगभरच्या पर्यटकांबरोबरच उद्योजकही मोठ्या प्रमाणात येऊन आर्थिक विकासाला चालना मिळेल. कोकणचे वैभव मोठे आहे. गोव्यापेक्षाही इथले समुद्र किनारे स्वच्छ, सुंदर आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. इथल्या स्थानिक उद्योजकांना, आंबा,काजू,फणस तसेच मासे निर्यातीला प्रोत्साहन व चालना मिळेल. या विमानतळाच्या निमित्ताने कोकणचे सौंदर्य जगासमोर जाणार असून येथील निसर्ग सौंदर्य आणि मातीचा सुगंध जगातील पर्यटकांना आकर्षित करेल असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विमानतळांचा विकास करण्याच्या दृष्टीने शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहेत. चिपी विमानतळ आंतरराष्ट्रीय होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. चिपी विमानतळावर विमान सेवा बरोबरच हेलिकॉप्टर सेवा ही सुरू झाल्यास पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेता येईल. शासनाने पर्यटनाला प्रोत्साहन व गती मिळण्यासाठी उद्योगाचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे उद्योजकांनाही या भूमीत चांगली संधी आहे. लवकरच मुंबई -गोवा महामार्गाचे काम तसेच राज्यातील अन्य महामार्गाची कामे सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.


हेही वाचा : केंद्र सरकार विरोधात पहिल्यांदाच महाराष्ट्र बंदची हाक, महाविकास आघाडीची घोषणा