३१ मे नंतर काय? मुख्यमंत्र्यांनी बोलवली महाविकास आघाडीची बैठक

Uddhav Thackeray sharad Pawar meeting
प्रातिनिधिक छायाचित्र

लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपायला येत असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतील घटकपक्षांची बैठक वर्षा बंगल्यावर बोलावली आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता आणि चौथ्या लॉकडाऊन नंतर केंद्राने राज्यांना दिलेले अधिकार यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून सरकारच्या स्थिरतेबाबत सुरु असलेली उलटसुलट चर्चा, राष्ट्रपती राजवटीसंदर्भातील स्पष्टता या मुद्द्यावरही बैठकीत खल होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या बैठकीला महाविकास आघाडीतील सर्व मंत्री आणि सचिव उपस्थित राहणार आहेत, असे सांगितले जात आहे. मात्र मुख्यमंत्री प्रत्यक्ष बैठकीला हजर राहणार की, मागच्या वेळेसारखे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार? याबाबत मात्र कोणतीही माहिती बाहेर आलेली नाही. मागच्या दोन दिवसांत राज्य सरकारच्या स्थिरतेबाबत चर्चा झाली, तसेच विरोधकांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शरद पवार यांनी थेट मातोश्री गाठून उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तब्बल दीड तास विविध विषयांवर चर्चा केली.

महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष सध्या नाराज असल्याचे बोलले जात आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली नाराजी कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली होती. तर काल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस महाराष्ट्रात डिसिजन मेकर नाही, असे सांगितले. त्यामुळे काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये समाधानी नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती. त्यामुळेच तातडीने ही बैठक बोलावण्यात आली असल्याचे माहिती मिळत आहे.