प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही!

मुंबई महापालिकेच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट बोट या सेवेचे लोकार्पण

three member ward system continue in municipal corporation elections excluding mumbai
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई महापालिका नागरिकांना सर्वाधिक सुविधा देत असते. पण जरा कुठे खुट्ट झाले की लगेच महापालिकेला दूषणे दिली जातात. महापालिका काय करते असा सवाल केला जातो. प्रश्नांचा भडिमार केला जातो. प्रश्न विचारणे सोपे असते. त्याला अक्कल लागत नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विरोधकांना लगावला. कामासाठी तिळगुळाची वाट न पाहता काम करत राहिले पाहिजे. तरच लोक आपल्याशी गोड बोलतील, गोड वागतील, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी महापालिकेच्या अधिकार्‍यांना दिला.

भाजपकडून सातत्याने शिवसेना, महाविकास आघाडी आणि मुंबई महापालिकेवर टीका केली जाते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी टीका करणार्‍यांना शुक्रवारी चांगलेच सुनावले. ठाकरे यांच्या हस्ते महापालिकेच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट बोट या सेवेचे लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

कोणी कौतुक करावे म्हणून नव्हे तर एक कर्तव्य म्हणून आपल्याला ही कामे करावे लागतात. कौतुकाची मला अपेक्षा नाही; पण जरा कुठे काही कमी झाले तर महापालिकेच्या नावाने खापर फोडायला मात्र, सर्व मोकळे असतात. जरा काही झाले तर नगरसेवक काय करतायत? महापौर काय करतायत? आयुक्त काय करतायत? हे सर्व ठिक आहे; पण तुम्ही काय करता? स्वत: काही करायचे नाही आणि महापालिका काय करते हे विचारायचे. प्रश्न विचारणे सोपे असते, त्याला फार काही अकलेची गरज नसते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

अनेकजण निवडणूक मते मागताना जनतेसमोर झुकलेले असतात. पण निवडणुका झाल्यावर ते ताठ होतात. महापालिका काम करते म्हणजे लोकांवर उपकार करत नाही; पण महापालिकेच्या कामाचा आवाका किती मोठा आहे, हेदेखील लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. मुंबई महापालिकेचा मोठेपणा केवळ सगळ्यांना दिसतो. पण हीच महानगरपालिका रोज कचरा उचलते, गटारं काढते, पाणीपुरवठाही करते, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. आपली महापालिका तंत्रज्ञानाच्या वापराबाबत देशातील नंबर एकची महापालिका असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

सर्वसाधारणपणे कोणतेही काम तिळगूळ दिल्याशिवाय होत नाही असा प्रशासकीय कामांमध्ये गैरसमज आहे. सरकारी कार्यालयात लोकांची साधी कामे असतात, परंतु ती करणे तर बाजूलाच राहिले, पण साधे उत्तर देखील मिळत नाही. अशावेळी नागरिकांमध्ये एक वैफल्य येते. मात्र, कामासाठी तिळगुळाची वाट न पाहता कामे करत राहिले पाहिजे. तरच लोक आपल्याशी गोड बोलतील, गोड वागतील, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांना दिला.

५०० चौरस फुटापर्यंत मालमत्ता कर रद्द करून आपण या वर्षाची सुरुवातच दणक्यात केली. त्यानंतर कोस्टल रोडच्या कामात मावळाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. अनेकदा असे होते की कामे न करता बोलणारी देखील अनेक लोक आहेत. तर, काही लोक काम करतात पण बोलतच नाहीत. जंगल मैं मोर नाचा किसने देखा असे त्याला म्हणतात. मात्र, आम्ही काय करतोय हे आम्ही संपूर्ण जगाला दाखवतोय. आमचा कारभार अत्यंत पारदर्शक आहे. यात लपवण्यासारखे काहीही नाही. तुमची सेवा करताना त्यात लपवाछपवी कशाला पाहिजे. जे आहे ते सर्व खुले आहे असेही ते म्हणाले. आपले लोक कौतुक करत नसले तरी कोविडच्या संकटात केलेल्या कामाचे न्यूयॉर्कपासून न्यायालयापर्यंत अनेकांनी केले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील आपल्या सहकार्‍यांचे कौतुक केले. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हा निर्णय माझ्या नेतृत्वाखाली झाला, असे म्हणतात. पण पण माझे साथीदार खंबीर आहेत, खांद्याला खांदा लावून साथ देत आहेत, त्यामुळेच मी हे काम करू शकत आहे. हे टीमवर्क आहे. तुमच्यासारख्या सहकार्‍यांमुळेच मी लोकप्रिय मुख्यमंत्री झालो. महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी साथ दिली नसती तर मुंबई महानगरपालिकेचे जागतिक स्तरावर कौतुक झालेच नसते, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.