घरताज्या घडामोडीअर्थव्यवस्थेकडे लक्ष द्या, अन्यथा अराजकता माजेल; उद्धव ठाकरेंचा मोदींना इशारा

अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्या, अन्यथा अराजकता माजेल; उद्धव ठाकरेंचा मोदींना इशारा

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आज केंद्र सरकारवर चांगलीच तोफ डागली. देशाच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष न देता भाजप सगळ्या राज्यात केवळ सरकार पाडापाडीकडे लक्ष देत आहे. भाजपने स्वतःच्या पक्षवाढीकडे बघावे, पण त्यासोबत थोडं देशाकडेही पाहावं, देश रसातळाला जात आहे, अन्यथा आपण अराजकतेकडे जाऊ, असा सूचक इशारा ठाकरे यांनी दिला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विजयादशमी सोहळ्यानिमित्त झालेल्या भाषणाचा उल्लेख ठाकरेंनी केला. “राजकारण म्हणजे शत्रूमधील युद्ध नव्हे. विवेक पाळा”, असे भागवत कुणाला उद्देशून म्हणाले असतील? असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला. जे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी विवेक पाळण्याची गरज आहे. मध्य प्रदेशमधले सरकार पाडले, महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे प्रयत्न होत आहेत. भाजप जेवढे लक्ष पक्ष वाढविण्याठी देत आहे, तेवढे लक्ष जर देशावर दिले तर देशाची प्रगती होईल, अशी खोचक टीका ठाकरेंनी केली.

- Advertisement -

ब्रिटिशांप्रमाणे काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंतचा हिंदुस्तान आम्हाला काबीज करायचा आहे, या अर्विभावात भाजप आहे. तसे वर्चस्व मिळवता देखील आले असते, मात्र भाजपला त्यांच्या मस्ती आणि वृत्तीमुळे हे शक्य होणार नाही. कारण आज एनडीए हे एनडीए राहिलेले नाही. त्यांचे सर्व मित्र एक एक करुन निघून चालले आहेत. दहीहंडीच्या थरावर ते वर आता एकटेच पोहोचलेत, खाली कोणीही नाही. मग खाली न उतरता मध्येच लटकल्यावर काय होतं? हे तुम्हाला कळेल, असंही ठाकरे यांनी नमूद केले.

जीएसटीची पद्धत फसलेली आहे. पंतप्रधानांनी आपली चूक प्रामाणिकपणे मान्य केली पाहीजे किंवा त्यात सुधारणा केली पाहीजे. मी यानिमित्ताने देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, आपण केंद्रासोबत GST बाबात चर्चा करुया. या पद्धतीमुळे राज्यांचे नुकसान होत आहे, असे आवाहन देखील ठाकरेंनी इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले. तसेच “आतापर्यंत मोदींना पर्याय कोण? असा प्रश्न सातत्याने भाजपच्यावतीने उपस्थित केला जात होता. मात्र एक दिवस असा येईल की, लोक म्हणतील कुणीही चालेल पण हे नको”, असा सणसणीत टोला देखील उद्धव ठाकरेंनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -