घरमहाराष्ट्रचिपीचे टेकऑफ - विमानतळाचे मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण

चिपीचे टेकऑफ – विमानतळाचे मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण

Subscribe

सर्वानी एकत्र येऊन विकास करूया - ठाकरे , बाळासाहेबांमुळेच कोकणाचा विकास - राणे

बहुद्देशीय चिपी विमानतळाचा लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यात शिवसेनेचे कडवे विरोधक असलेले केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले आणि त्यांनी एकमेकांवर कुरघोडी करत उद्घाटन सोहळ्याचा रंग बदलला. खोटे बोलणारी माणसे बाळासाहेबांना आवडत नव्हती, म्हणून अशा लोकांना त्यांनी पक्षातून काढले, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या सेना दुराव्याची स्पष्टोक्ती दिली. याच व्यासपीठावर राणेंनी उद्धव ठाकरेंच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी गार्‍हाणे घातले. नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या सोहळ्यात ऑनलाईन सहभाग घेत चक्क मराठीतून भाषण केले आणि चिपीच्या या विमानतळामुळे कोकणला विकासाची संधी चालून आल्याचे म्हटले.

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १६ वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर प्रथमच एका व्यासपीठावर आले होते. यावेळी नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दुरीचे दर्शन पुन्हा एकदा पाहायला मिळाले. व्यासपीठावरून बोलताना नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. सोहळ्यात राणे यांचे भाषण झाले. आपल्या भाषणात त्यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. राऊत यांनी चिपी विमानतळासह जिल्ह्यातील अनेक विकासकामांत अडथळा निर्माण केल्याचा गंभीर आरोप राणेंनी केला. राऊत यांनी सुभाष देसाई यांचा उल्लेख चिपी विमानतळाचे मालक असा केल्याचा उल्लेख करत ‘यामुळे मला कळले विमानतळाचे मालक कोण? उद्धवजी, कोकणचा विकास हे जे काही आहे ते मी साहेबांच्या प्रेरणेतून आत्मसात केले. त्यात माझा स्वार्थ नव्हता. मी छोटा-मोठा उद्योजकही आहे. सिंधुदुर्गाचा विकास कोणत्या माध्यमातून करता येईल याचा विचार मी केला. तेव्हा विमानतळाचा मुद्दा समोर आला.

- Advertisement -

तेव्हा मी टाटांकडे गेलो. बाजूला गोवा आहे, तुम्हाला समुद्र लाभलाय. पर्यटनाच्या दृष्टीने पोषक जिल्हा आहे. आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री आहेत. त्यांनी टाटांच्या अहवालाचा अभ्यास करावा. विकासासाठी पैसा द्यावा. धरणाला एक रुपया दिला जात नाही. धरणाचं काम अजून पूर्ण नाही. 95 ला युतीची सत्ता आली. मनोहर जोशींना मी सांगितलं की पर्यटन जिल्हा करू. तेव्हा केंद्राकडे परवानगी मागितली आणि देशातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग झाला. साहेबांच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो. त्यावेळी गोपीनाथ मुंडे माझे सहकारी होते. जिल्ह्यातील पुलांच्या कामासाठी 120 कोटी, पाण्यासाठी 118 कोटी दिले. आज जे इन्फ्रास्ट्रक्चर दिसते आहे त्याच्या उभारणीला राणेंचे योगदान आहे. दुसरा कुणी इथे येऊच शकत नाही, असे राणे म्हणाले.

राणे यांच्या टीकेला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जशास तसे उत्तर दिले. ते म्हणाले; नारायणराव आपण म्हणता ते खरे आहे. तुम्ही जी विकासकामे केली त्यात तुमचं योगदान नक्की आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद नक्की देतो. पण कोकणची जनता डोळे मिटून कधीच राहत नाही. ती शांत आहे, संयमी आहे. म्हणून सदासर्वदा भयभीत होऊन ती काही करेल असे अजिबात नाही, ती मर्द आहे. म्हणूनच त्या जनतेने तिच्या हक्काचा लोकप्रतिनिधी अनेक वर्षांपासून निवडून दिला आहे. म्हणून खासदार विनायक राऊत यांचा मला अभिमान आहे. हे ही खरे आहे की, बाळासाहेबांना खोटे बोलणारे लोक आवडत नव्हते. म्हणूनच असे खोटे बोलणार्‍यांना त्यांनी शिवसेनेतून काढून टाकले, हा इतिहास आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर पलटवार केलाय.

- Advertisement -

‘आपण केंद्रात मंत्री आहात. लघू का असेना सुक्ष्म का असेना पण खाते मोठे आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राला नक्की करून द्याल, ही तुमच्याकडून मला अपेक्षा आहे. मी कुठेही पक्षभेद आणत नाही. तुमच्या कॉलेजच्या बाबतीत जेव्हा फोन केलात, तेव्हा दुसर्‍याच क्षणी मी सही केली. विकासाच्या कामात मी कोतेपणा आणू इच्छित नाही; पण पेढ्यातला गोडेपणा अंगी बाळगावा लागतो. म्हणून ‘तिळगूळ घ्या गोड बोला’ असे म्हणतात. मला बोलायचे नाही. बोलावे लागत आहे. आजचा कार्यक्रम कोकणसाठी महत्त्वाचा आहे. सगळे मिळून काम करू, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सिंधिया महाराष्ट्राच्या अनेक विमानतळांबद्दल भरभरून बोलले. तुमचे अभिनंदन करतो. इतक्या लांब राहूनही मराठी मातीचा संस्कार आपण जपलात. मला वाटत होते की मी केंद्रीय मंत्री आहे आणि तुम्ही मुख्यमंत्री आहात. पण इथे राजकारण येणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सिंधुदुर्गच्या नव्या अध्यायाची सुरुवात-ज्योतिरादित्य शिंदे
त्यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदेही या कार्यक्रमासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. शिंदे यांनी यावेळी आपले भाषण मराठीतून केले. महाराष्ट्राशी माझे रक्ताचे आणि भावनिक नाते असल्याचे शिंदे म्हणाले. हे केवळ चिपी विमानतळाचं उद्घाटन नाही तर सिंधुदुर्गच्या नव्या अध्यायाला सुरुवात असल्याचा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केलाय. ‘माझा महाराष्ट्राशी फक्त राजकीय संबंध नाही. माझे एक पारंपरिक आणि रक्ताचे संबंध आहेत. माझे सिंधुदुर्गासोबतही भावनिक संबंध आहेत. सिंधुदुर्गाचा विशाल इतिहास आणि आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मोठा आहे. हा जिल्हा शौर्याचे प्रतिक आहे. सिंधुदुर्गाची ही एक केसरीया धरती आहे. हे फक्त विमानतळाचे उद्घाटन नाही. आता नव्या अध्यायाला सुरुवात झाली. बाळासाहेब थोरात आणि नारायण राणे यांनीही सांगितले की, माझ्या वडिलांचे विमानतळाचे एक स्वप्न होते. त्यांनी रेल्वे मंत्री असतानाही कोकणात रेल्वेसाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केला. मी महाराष्ट्र सरकारला धन्यवाद आणि अभिनंदन करतो, असे शिंदे यावेळी म्हणाले.

काही दिवसात २५ विमाने येतील
तीन वर्षांपूर्वी एक विमान आले होते. आज त्याच ठिकाणी एका नव्या विमानतळाच्या उद्घाटनाचा श्रीगणेशा आम्ही एकत्र मिळून करत आहोत. कोकणाला प्राकृतिक सौंदर्य आहे. आंबे, काजू, मासे हे सगळे व्यवसाय आम्हाला देशात प्रसिद्ध करायचे आहेत. सिंधुदुर्गात किल्ला, समुद्र तट, मंदिरे, असे सारे आहे. गोव्याची प्रसिद्धी आम्हाला सिंधुदुर्गात हवी आहे. गोवा जवळ आहे. इथे पर्यटनाचे केंद्र आम्हाला हवे आहे. आज सुरुवात झाली. ही फक्त सुरुवात आहे. 500 किमीचं अंतर 50 मिनिटांत पार करणार आहोत. पुढच्या काही दिवसात 20-25 विमाने सिंधुदुर्गात येतील. पंतप्रधान मोदी यांनी लोकल फॉर ग्लोबलची घोषणा केली आहे. आम्ही सिंधुदुर्गाचा नक्कीच तसा विकास करू, असे शिंदे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -