या संकटातही काहीतरी सकारात्मक घडतंय – उद्धव ठाकरे!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गुढी पाडव्यानिमित्त राज्यातल्या जनतेशी सोशल मीडियावर संवाद साधत आवाहन केलं आहे.

cm uddhav Thackeray live on FB

मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर राज्यात करोनाचा फैलाव रोखता येईल अशी आशा वाटत असतानाच अनेक ठिकाणी नागरिक केवळ भितीपोटी बाहेर किराणा किंवा भाजीपाल्यासाठी गर्दी करत आहेत. अशा नागरिकांना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गुढीपाडव्याच्या संदेशामध्ये आवाहन केलं आहे. गुढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोशल मीडियावरून लोकांशी संवाद साधला. यावेळी, ‘काहीही झालं, तरी किराणा, भाजीपाला, अन्नधान्य, डॉक्टर्स, नर्सेस, पशुखाद्य, पशुवैद्यक अशा जीवनावश्यक बाबी बंद होणार नाही. त्यामुळे घाबरून गर्दी करू नका’, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मात्र त्यासोबतच, त्यांनी सध्या सुरू असलेल्या करोना व्हायरसच्या संकटाच्या काळात काहीतरी सकारात्मक देखील घडतंय, असं सांगत जनतेला धीर दिला.

‘जे गमावलं, ते परत येतंय’

‘मी तुम्हाला काहीही निगेटिव्ह सांगायला आलेलो नाही. मी फक्त शुभेच्छा द्यायला आलोय. करोनाची सगळ्यांना पूर्ण कल्पना आली आहे. घराबाहेर पडू नका, हे आवाहन आहेत. हे जागतिक युद्ध आहे. ते कोणतंही युद्ध असो, आपल्याला लढावं लागतं. घराबाहेर पडलात तर हा शत्रू कुठून हल्ला करेल, माहीत नाही. घराबाहेर पडू नका. पण यात सकारात्मक देखील काहीतरी आहे. घराघरात बऱ्याच महिन्यांनी कुटुंबीय एकत्र आले आहेत. कुणी वाचन करतंय, कुणी संगीत ऐकतंय, कुणी एकत्र खेळतंय. त्यामुळे आपण जे गमावलं होतं, ते पुन्हा मिळू लागलंय. ही चांगली गोष्ट आहे’, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

CMOMaharashtra ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಮಾರ್ಚ್ 25, 2020

‘तुम्ही घराबाहेर पडू नका’

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या नव्या निर्देशाचा देखील उल्लेख केला. ‘केंद्र सरकारने सांगितलं आहे की शक्यतो एअर कंडिशनर बंद करा. खिडक्या उघडून हवा येऊ द्या. मी म्हटलं आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही चला हवा येऊ द्या मोडवरच आहोत. पण मी विनोद करत असलो तरी याचा अर्थ असा नाही की संकट संपलं आहे. पण काही जण असे आहेत की ज्यांच्या घराचा सुद्धा पत्ता नाही. पण त्यांच्याबद्दल देखील सरकार पूर्णपणे खबरदारी घेतंय. कोणत्याही परिस्थितीत औषधं, धान्य, भाजीपाला, पशुखाद्य, पाळीव प्राण्यांची खाद्य, पशुवैद्यक, आपले माणसांचे दवाखाने या सेवा आपण बंद केलेल्या नाहीत. हे सर्व उघडं राहील. ज्यांचं पोट तळहातावर आहेत, त्यांच्यासाठी कंपन्यांचे मालक मदतीसाठी आपल्या संपर्कात आहेत. अनेक हात त्यासाठी पुढे येत आहेत. माझं आवाहन आहे की तुमच्याकडे जो कर्मचारी आहे, ज्याचं तळहातावर पोट आहे, त्याचं वेतन थांबवू नका’, असं मुख्यमंत्री म्हणाले.


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही अत्यावश्यक सेवा असलेले मुंबईतील दवाखाने बंदच!