घरताज्या घडामोडीआम्ही तुमच्या सोबत काळजी नको, स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी दिला धीर

आम्ही तुमच्या सोबत काळजी नको, स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी दिला धीर

Subscribe

स्वप्नील लोणकरच्या बहिणीला सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून कार्यवाहीचे निर्देश

एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही सरकारी सेवेत नियुक्ती न मिळाल्याने निराश झालेल्या स्वप्नील लोणकर या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली होती. स्वप्नीलच्या आत्महत्येमुळे एमपीएससीतील त्रुटी समोर आल्या होत्या. शुक्रवारी लोणकर यांचे आई, वडील आणि बहिण यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वप्नीलचे आई, वडीलांचे सांत्वन केले. तसेच स्वप्नीलच्या बहिणीला करता येईल, ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वस्तही केले. तिचे शिक्षण आणि पात्रतेनुसार तिला रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

‘आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत..काळजी करू नका,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना धीर दिला. स्वप्नीलच्या बहिणीला सक्षम करण्यासाठी कार्यवाहीचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. उद्धव ठाकरे यांनी स्वप्नीलच्या आई छाया, वडील सुनील तसेच बहिण पूजा यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. घटना दुर्देवी आहे. पण धीराने घ्यावे लागेल. आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नका, असा धीर मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

- Advertisement -

यावेळी विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सर्वश्री अनिल देसाई, विनायक राऊत, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर, सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी वाघमोडे आदी उपस्थित होते.

भाजप नेत्यांची टीका

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. भातखळकर यांनी ट्विटमध्ये, “अरेरे, दुर्दैवी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना अखेर मुख्यमंत्र्याना भेटायला सह्याद्री अतिथीगृहात जावं लागलं. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले तसे स्वप्नीलच्या घरी जाता आले नसते का? हे तर निबर कातडीचे सरकार, संवेदना हरवलेले सरकार” असे म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केलं होते परंतु स्वप्नील लोणकरच्या घरी जाऊन सांत्वन करणं टाळलं असल्यामुळे भाजपने निशाणा साधला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -