घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगड दौऱ्यावर, निसर्ग वादळ नुकसानग्रस्तांना करणार मदत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगड दौऱ्यावर, निसर्ग वादळ नुकसानग्रस्तांना करणार मदत

Subscribe

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला नुकसान झाले असून, या चक्रीवादळाचा फटका हा सर्वाधिक रायगड जिल्ह्याला बसला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी १४ जून रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असून चौल, बोर्ली, मुरुड येथे चक्रीवादळग्रस्तांना मदत साहित्य आणि अनुदान वाटप करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी सकाळी १० वाजता मांडवा जेट्टी येथे पोहोचतील. त्यानंतर चौल येथे जाऊन ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतील. ११ वाजता चौल मधील घरे, पिके नुकसानीची पाहणी करून नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते सानुग्रह अनुदान, सौर कंदील, इतर साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच दुपारी १२ वाजता त्यांचे बोर्ली येथे आणि १२.३० वाजता मुरुड येथे मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार असून, दोन्ही ठिकाणी नुकसानीची पाहणी आणि मदत वाटप करण्यात येईल. तसेच त्यानंतर मुरुड उद्धव ठाकरे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

याआधी रायगडसाठी १०० कोटींची घोषणा

दरम्यान, निसर्ग चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ अलिबाग येथे जाऊन रायगड जिल्ह्यासाठी तातडीने १०० कोटींची मदत जाहीर केली होती. निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले, मात्र चक्रीवादळामुळे जिल्ह्याचे अपरिमित नुकसान झाले आहे. असे असले तरीही आपल्याला पुन्हा उभे राहावेच लागेल, यासाठी रायगड जिल्ह्याला तातडीची मदत म्हणून सरकारकडून शंभर कोटी रुपये देण्याची घोषणा केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रसेचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील निसर्ग चक्रीवादळमुळे नुकसान झालेल्या भागाची पहाणी करण्यासाठी दोन दिवसीय कोकणाचा दौरा केला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या बैठकीत निसर्ग चक्रीवादळग्रस्‍त कोकणवासियांना आणखीन काय मदत करता येऊ शकते याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली होती. तसेच शरद पवार हे केंद्राच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले होते.

- Advertisement -

cm uddhav thackeray raigad visit plan

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -