शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; २६ जानेवारीपासून लागू!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ जानेवारी म्हणजेच मंगळवारी राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार, शाळांमध्ये परिपाठाऐवजी राज्यघटनेची प्रस्तावना वाचण्याचे आदेश देण्यात आले आहत.

Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून २६ जानेवारीला मुंबईत नाईट लाईफ सुरू करण्याचा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा निर्णय चर्चेत आणि काहीसा वादात सापडला आहे. मात्र, दुसरीकडे त्यांचे वडील आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या शाळांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय देखील येत्या २६ जानेवारीपासून शाळांमध्ये अंमलात आणला जाणार आहे. या निर्णयाचं अनेक स्तरांतून स्वागत होत आहे. येत्या २६ जानेवारीपासून राज्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये वर्ग सुरू होण्याआघी घेतल्या जाणाऱ्या परिपाठामध्ये भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचा समावेश करण्यात आला आहे. वास्तविक यासंदर्भातला निर्णय ४ फेब्रुवारी २०१३ रोजीच जाहीर करण्यात आला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याचं लक्षात आलं होतं. त्यामुळे अखेर राज्यसरकारने त्यासंदर्भातला दुसरा जीआर काढून येत्या २६ जानेवारीपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भातला शासन निर्णय अर्थात जीआर २१ तारखेला जारी करण्यात आला आहे.

GR on Preamble of India

राज्यघटनेतल्या न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही मूलतत्व समाजमनावर कोरली जावीत, लहानपणापासूनच विद्यार्थ्यांवर संविधानातील तत्वांचे संस्कार व्हावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे.