‘सभागृहात रोज हजर रहा’, आघाडीच्या आमदारांना मुख्यमंत्र्यांचे आदेश!

Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले असून, दोन्ही सभागृहांचे कामकाज शोकप्रस्तावानंतर तहकूब करण्यात आले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असून, ‘अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असेपर्यंत सभागृहात रोज सर्व आमदारांनी उपस्थित राहायला हवे’, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच सरकारला अडचण निर्माण होईल असे वक्तव्य कुणीही करू नये, अशी तंबीच महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तिन्ही पक्षाच्या आमदारांना दिली आहे.

‘हे सरकार पडणार नाही’

दरम्यान, नुकतीच भाजपा खासदार नारायण राणे यांनी ‘हे सरकार ११ दिवसांत पडेल’ अशी टीका केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर शंका उपस्थित केले जाऊ लागली. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना धीर देत ‘हे सरकार पडणार नाही याची शाश्वती मी देतो’, असे सांगितले. तसेच, ‘कोणीही काहीही बोललं तरी आपलं सरकार टिकणार’, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या बैठकीत दिला. दरम्यान, महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधींचेही कौतुक केले. सोनिया गांधी या चांगल्या विचारांच्या आहेत, असे सांगत हे सरकार नक्कीच टिकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


वाचा सविस्तर – खरंच येत्या ११ दिवसांत उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळणार?

दरम्यान, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील महाविकास आघाडीच्या बैठकीत सर्व आमदारांना विधानसभेत हजर रहा, चर्चेत सहभागी व्हा, आपले प्रश्न मांडा, जनतेचे प्रश्न सोडवा, लोकांना महाविकासआघाडीकडून हीच अपेक्षा असल्याचे सांगितले.