वापरून फेकून द्यायचे हीच भाजपची नीती ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

संपूर्ण देशात आज आणीबाणीसदृश आणि गुलामगिरीची परिस्थिती आहे. मात्र, देशातील खरे हिंदू हे वातावरण होऊ देणार नाही. आपल्याला बलवान हिंदुत्व हवे आहे. आज आपण गप्प बसलो तर गुलामगिरी येईल. त्यामुळे आपल्याला आणीबाणीसदृश परिस्थिती मोडायची असेल तर शिवसेनाप्रमुखांनी दाखवलेल्या मार्गाने जावे लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले

CM Uddhav Thackeray Slams BJP during bal thackeray birth anniversry

जेव्हा यांचे डिपॉझिट जप्त होत होते, तेव्हा यांनी प्रादेशिक पक्षाशी युती केली. पण आता वापरून फेकून द्यायचे हीच भाजपची नीती आहे. हे नवहिंदुत्ववादी हिंदुत्वाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहेत, अशा तिखट शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी ऑनलाइन संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेची २५ वर्षे युतीत सडली या वक्तव्यांचा पुनरुच्चार करत आजही या मतावर ठाम असल्याचे नमूद केले.

संपूर्ण देशात आज आणीबाणीसदृश आणि गुलामगिरीची परिस्थिती आहे. मात्र, देशातील खरे हिंदू हे वातावरण होऊ देणार नाही. आपल्याला बलवान हिंदुत्व हवे आहे. आज आपण गप्प बसलो तर गुलामगिरी येईल. त्यामुळे आपल्याला आणीबाणीसदृश परिस्थिती मोडायची असेल तर शिवसेनाप्रमुखांनी दाखवलेल्या मार्गाने जावे लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. त्यांच्या भगव्याचा रंग पुसट होत चाललाय भाजपने सत्तेसाठी पोकळ हिंदुत्वाचे ढोंग घेतले आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी सोयीप्रमाणे हिंदुत्व बदलणार्‍यांनी हिंदू असाल तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एक धोरण घेऊन पुढे यावे, असेही ठाकरे यांनी सुनावले. त्यांच्या भगव्याचा रंग पुसट होत चालला असून नवहिंदुत्ववादी स्वतःच्या स्वार्थासाठी सोयीप्रमाणे हिंदुत्व बदलत आहेत,अशी टीकाही त्यांनी केली.

 

उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीवरून भाजप सातत्याने टीका करत आहे. या टीकेचा ठाकरे यांनी सुरुवातीलाच समाचार घेतला. राज्यात जसे काळजीवाहू सरकार असते तसे काळजीवाहू विरोधक आहेत. या विरोधकांना आपण लवकरच भगव्याचे तेज दाखवू. हे काळजीवाहू विरोधक पूर्वी आपले मित्र होते, याचे मला दुःख आहे. मी गोरेगावच्या शिबिरात युतीत २५ वर्षे शिवसेना सडली असे विधान केले होते. या विधानावर आपण ठाम आहोत. यांना वचन मोडून शिवसेनेला गुलामासारखे वागवायचे होते. त्यांचे हे स्वप्न आपण मोडून काढले.सूर्य उगवण्याच्या आत नव्हे तर सूर्य उगवल्यानंतर शिवतीर्थावर आपण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अंधारात चोरून मारून शपथ घेतली नाही, असा टोला ठाकरे यांनी भाजपला लगावला.
सत्तेसाठी काहीही करण्याच्या भाजपच्या प्रवृत्तीवरही ठाकरे यांनी कोरडे ओढले. तुम्ही विरोधी पक्षाचे सरकार पाडून, आमदार फोडून सरकार बनवता. नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या संसारात मोडता घातला. संघमुक्त भारत म्हणणार्‍या नितीशकुमार आणि मोदी हटाव म्हणणार्‍या चंद्राबाबू यांच्यासोबत युती करता. हे करून वरून लोकशाहीवादी असल्याचा टेंभा मिरवता? असा सवाल ठाकरे यांनी केला.

बाबरी मशीद पाडली तेव्हा हिंदुत्वाचे भंपक शिलेदार बाजूला झाले. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर आपल्याला अभिमान आहे, असे म्हटले होते. त्यावेळी देशभरात शिवसेनाप्रमुखांची लोकप्रियता होती. आपण त्याचवेळी महाराष्ट्रातून सीमोल्लंघन केले असते तर न जाणो आज दिल्लीत आपला पंतप्रधान दिसला असता, असे सांगत ठाकरे यांनी दिल्ली काबीज करण्यासाठी यापुढे देशभरात निवडणूक लढवण्याचे जाहीर केले. सुरुवातीला भाजपच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होत होती. आता ते सत्तेत आहेत. त्यामुळे आपल्याही आयुष्यात एक दिवस येईल, असा आशावाद ठाकरे यांनी शिवसैनिकांमध्ये जागवला.

नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालावरून उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचे कान टोचले. त्याचवेळी जेव्हा युती करून निवडणूक लढवत होतो त्यापेक्षा अधिक जागा शिवसेनेच्या निवडून आल्याचा दावा ठाकरे यांनी केला. लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे ग्रामपंचायत ते जिल्हा बँक आणि स्थानिक निवडणुका जिद्दीने लढण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले.

एक व्हायरस तिसरी लाट आणू शकतो तर आपण शिवसेनेच्या तेजाची, भगव्याच्या तेजाची लाट का निर्माण करू शकत नाही.लवकरात लवकर महाराष्ट्र पिंजून काढणार, काळजीवाहू विरोधकांना भगव्याचे तेज दाखवणार. भाजपने सत्तेसाठी हिंदुत्वाचे कातडे पांघरले. आम्ही हिंदुत्व सोडले नाही, सोडणार नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. भाजपने समता, ममता सगळ्यांना समवेत युती केली. अटलजींना शिवसेनेने सहकार्य केले. मात्र, भाजपने सोयीप्रमाणे काश्मिरात, नितिशकुमार सोबत युती केली. मतांसाठी गोवंश बंदी दूर केली.

आपण दोन वर्षात विधान परिषद निवडणूक हरलो. ज्यांना गद्दारी करायची त्यांनी शिवसेना खुशाल सोडावी. लढाई निर्णायक निष्ठेने असते. भाजप विरोधी लढ्यात आपण एकमेव पक्ष. वाघ असाल तर बंगालच्या वाघिणीसारखे लढा. यापुढे प्रत्येक निवडणूक बँक, स्वराज्य संस्था लोकसभा सर्व निवडणुका जिंकण्यासाठी लढायच्या. निवडणुकीत निष्काळजीपणा नको. फाजिल आत्मविश्वास नको. आजही साहेब आपल्यातच आहेत असे समजा. आपण असे काय केले तर आपल्या पाठीवर कौतुकाची थाप साहेब मारतील, असा रोज विचार करा