घरमहाराष्ट्रआम्ही तुमच्या सोबत, काळजी करु नका; मुख्यमंत्र्यांनी केली कल्पिता पिंपळेंची विचारपूस

आम्ही तुमच्या सोबत, काळजी करु नका; मुख्यमंत्र्यांनी केली कल्पिता पिंपळेंची विचारपूस

Subscribe

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून कल्पिता पिंपळे यांची विचारपूस त्यांच्या धैर्याचे कौतुक केलं.

महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्प‍िता पिंपळे व अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर कारवाईदरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर दोघेही ज्युपिटर रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्या मोबाईलवर संपर्क करुन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी तुम्ही लवकर बरे व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही अजिबात काळजी करु नका. याचबरोबर गुन्हेगारांवर कडक कारवाई होईल असे आश्वासन देत मुख्यमंत्री यांनी कल्प‍िता पिंपळे यांनी दाखवलेल्या धैर्याचे कौतुक केले.

सोमवारी (३० ऑगस्ट) माजिवडा मानपाडा प्रभागसमिती अंतर्गत कासारवडवली येथे रस्त्यावर अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या हातगाडी व फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करीत असताना सहाय्यक आयुक्त कल्प‍िता पिंपळे व अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर अमरजीत यादव या फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये कल्प‍िता पिंपळे व सोमनाथ पालवे यांना आपल्या हाताची बोटे गमवावी लागली ही अत्यंत दुर्देवी बाब असून या घटनेचा संपूर्ण राज्यात निषेध व्यक्त होत आहे. दोन्ही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ज्युपिटर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली.

- Advertisement -

सध्या कल्प‍िता पिंपळे या उपचार घेत असून अंगरक्षक सोमनाथ पालवे यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्या मोबाईलवर संपर्क साधून कल्प‍िता पिंपळे यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. तसेच त्यांनी जे धैर्य दाखविले त्याबद्दल त्यांचे कौतुक केले.”आपण लवकर बरे व्हा, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत,” असे सांगत हल्लेखोरावर कडक कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. या दरम्यान महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी देखील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून या कर्मचाऱ्यांना शासनातर्फे सानुग्रह अनुदान देणेबाबतचा प्रस्ताव सादर केला असून याबाबत लवकर निर्णय व्हावा अशी विनंती देखील केली. याबाबत योग्य तो निर्णय लवकरच होईल असे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. यावेळी उध्दव ठाकरे यांनी फेरीवाल्यांवरील कारवाईबाबत माहिती घेवून ही कारवाई अशीच सुरू ठेवा अशाही सूचना यावेळी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना दिल्या.

- Advertisement -

महापालिका कार्यक्षेत्रात रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी होणारे अतिक्रमण हटविणेबाबत वेळोवेळी कारवाई केली जाते. परंतु काही समाजकंटकांकडून अशा प्रकारचे गैरकृत्य केले जाते. अशा घटनांमध्ये गुन्हेगारावर कारवाई होते परंतु हे गुन्हेगार जामीनावर सुटल्यानंतर मोकाट फिरत असतात. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होते. या घटनेसंदर्भात आम्ही महासभेमध्ये एकमताने ठराव करुन सदरचा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवून गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा करावी असा ठराव मा. न्यायालयाकडे सादर करणार असल्याबाबतही महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

तसेच रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे उभ्या राहत असलेल्या कोणत्याही फेरीवाल्यांकडून नागरिकांनी वस्तू खरेदी करु नये, जेणेकरुन भविष्यात अशा दुर्घटना घडणार नाही असे नमूद करीत सर्व ठाणेकर नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी यावेळी केले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -