घरमहाराष्ट्रधमकी देऊ नका…एक झापड दिली, तर पुन्हा उठणार नाही; मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा

धमकी देऊ नका…एक झापड दिली, तर पुन्हा उठणार नाही; मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाच्या शुभारंभप्रसंगी सूचक इशारा दिला आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन तोडू असं वादग्रस्त विधान शनिवारी केलं. याचे पडसाद उमटत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील या वक्तव्याचा समाचार घेतला. धमकी देऊ नका…एक झापड दिली, तर पुन्हा उठणार नाही, असा एक सूचक इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचं बांधकाम केलं जाणार आहे. बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी इशार दिला. “सतेज पाटीलजी, डबल सीट म्हणाले. पण आपलं सरकार ट्रिपल सीट आहे. हे मुद्दामहून बोलतोय. कारण आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतुक केलं की भीती वाटते. तो डॉयलॉग आहे ना थप्पड से डर नहीं लगता… पण अशा थापडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहेत. यापुढेही देऊ. त्यामुळे आम्हाला झापड मारण्याची धमकी देऊ नये. एकच झापड देऊ की, पुन्हा कधी उठणार नाही. हा शिवसेनेचा हा लढवय्याचा गुण आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनावर हल्ला करण्याच्या विधानाचा समाचार घेतला.

- Advertisement -

…असं स्वप्न कधी पाहिलं नव्हतं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना मुख्यमंत्री पदावर असताना एका चांगल्या कार्याची सुरूवात माझ्या हस्ते होईल असं स्वप्न कधी पाहिलं नव्हतं, अशा भावना व्यक्त केल्या. आयुष्यात काही क्षण अनपेक्षित असतात मी मुख्यमंत्री होईल याचे देखील कधी स्वप्न पाहिलं नव्हतं, पण आज या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन मुख्यमंत्री म्हणून माझ्या हस्ते होतोय याचा मला खूप आनंद आहे. ज्या जांबोरी मैदानाने क्रांतीच्या ठिणग्याना जन्माला घातले आहे, त्या ठिकाणीच आज हा रोमहर्षक असा क्षण घडतोय. बीडीडी चाळींचा एक मोठा इतिहास आहे. या चाळीनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली, महाराष्ट्रासाठी रस्त्यावर सांडलेले रक्त पाहिलं. वासुदेव बळवंत फडके यांसारखे क्रांतिकारक देखील या चाळींमधील राहिले. बटाट्याची चाळ या पुस्तकातून पू. ल. देशपांडे यांनी चाळीच्या जीवनाचे सुंदर वर्णनच केलं आहे.

आपण कितीही मजली इमारती आणि टॉवर्स या ठिकाणी बांधले तरी या चाळींच्या ऋणातून आपण मुक्त होणार नाही. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,असं म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांनी क्रांतीची मशाल पेटवली. पण आज या स्वराज्यामध्ये लोकांना हक्काचे घर आहे की नाही, ही खंत कोणी व्यक्त करायची? आज आम्ही हे आव्हान स्वीकारले असून या स्वराज्यात स्वतःचं हक्काचं घर आम्ही देत आहोत. गेल्या काही महिन्यात सुमारे पाच लाख घरं आपण ग्रामीण भागामध्ये ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून बांधली, गिरणी कामगारांना देखील घर देण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

माझे दोन्ही आजोळ हे चाळीतच राहिले, मी त्यांच्याकडे लहानपणापासून जायचो, त्यामुळे चाळीतले जीवन मला माहितीये. उद्या चाळीतून तुम्ही टॉवरमध्ये जरी गेलात तरी आपली संस्कृती तुटू देऊ नका, अख्खे आयुष्य आपण याठिकाणी जगला आहात, हे घर तुमचे स्वतःचे आहे, त्यामुळे कोणत्याही मोहात पडू नका आणि मराठी पाळंमुळांना धक्का लावू देऊ नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -