घरमहाराष्ट्रनाशिकराज्यात भाजपचाच मुख्यमंत्री

राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री

Subscribe

भाजप प्रभारी सरोज पांडे यांचे नाशिकमध्ये वक्तव्य; श्रेष्ठींची तंबी झुगारुन मुख्यमंत्रीपदाबाबत जाहीर वाच्यता

मुख्यमंत्रीपदाबाबत यापुढे पक्षातील कोणीही जाहीर चर्चा करणार नाही, अशी तंबी भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींनी देऊनही भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी, ‘काहीही झाले तरी मुख्यमंत्री भाजपचाच होणार’, असे वक्तव्य नाशिकमध्ये केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद उद्भवला आहे.

मुख्यमंत्री भाजपचाच होणार असे वक्तव्य पक्षातील अनेकांनी वेळोवेळी केल्याने शिवसेनेच्या गोटात त्याविरोधात संतप्त प्रतिक्रीया उमटत होती. लोकसभा निवडणुकीत युतीवर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्रीपद हे शिवसेना आणि भाजपला अडीच-अडीच वर्षांसाठी दिले जाईल, अशी ग्वाही राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांनी दिली होती. शिवाय शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनीही यासंदर्भात आपल्या पदाधिकार्‍यांना माहिती देत समजूत काढली होती. त्यानंतर वारंवार मुख्यमंत्री भाजपचा होणार, अशी वाच्यता भाजप नेत्यांकडून केली जात असल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीवर परिणाम व्हायला नको म्हणून यापुढील काळात मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चाच करायची नाही, अशी तंबी भाजपच्या नेत्यांना श्रेष्ठींनी दिली आहे. असे असतानाही सरोज पांडे यांनी मुख्यमंत्री भाजपचाच होणार असे वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींची बैठक नाशिकमधील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पांडे यांनी हे विधान केले. विधानसभा निवडणूक कुठल्याही परिस्थितीत भाजप-शिवसेना युती करुनच लढवली जाईल. मुख्यमंत्री मात्र भाजपचा असेल असे त्यांनी यावेळी सांगितले. याविधानानंतर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे बघणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisement -

सगळं काही समसमान, तरीही…

शिवसेनेचा वर्धापन दिन असताना त्या मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. मुख्यमंत्री कोण होणार? पुढे काय होणार याची चिंता तुम्ही करू नका आमचं सगळं काही ठरलं आहे असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हा विषय तूर्तास गौण आहे असंही ते म्हटले होते. तर आमचं सगळं ठरलं आहे सगळं काही समसमान होईल हे मुख्यमंत्र्यांनाही ठाऊक आहे असं उद्धव ठाकरे म्हटले होते. या सगळ्याला  उलटत नाहीत तोच मुख्यमंत्री भाजपाचाच होणार असं वक्तव्य सरोज पांडे यांनी केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -