लवकरच मुख्यमंत्र्यांची ईडी चौकशी ? भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांच्या दिल्लीत भेटीगाठी

बेनामी मालमत्तेमुळे ठाकरेंच्या अडचणीत वाढ

kirit Somaiya accuses CM uddhav thackeray announce locldown in Korlai for fear of exposing scam

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वास्तुविशारद अन्वय नाईक यांची रायगडमधील मालमत्ता सहा वर्षे बेनामी पद्धतीने आपल्याकडे ठेवली. तसेच या मालमत्तेचा व्यवहार विधानसभा निवडणूक २०१९च्या प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवला नाही. ११ नोव्हेंबर २०२० रोजी रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांच्या रायगडमधील बेनामी मालमत्तेचा पर्दाफाश केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी म्हणजे १२ नोव्हेंबर २०२० रोजी दोघांनी मालमत्ता कर, वीज कर आणि पाणीपट्टी भरल्याचा दस्तावेज आपल्याकडे उपलब्ध आहे.

त्यामुळे मागील सहा वर्षे अन्वय नाईक यांची मालमत्ता आपल्याकडे ठेवणे हा एक प्रकारचा बेनामी मालमत्तेचा आणि मनी लॉड्रिंगचा व्यवहार आहे. त्यामुळे त्याची तक्रार आपण आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) करणार आहे, असे भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी ‘आपलं महानगर’ला सांगितले. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच ईडीकडून चौकशी होऊ शकते, असा दावा किरीट सोमय्या यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

भाजपचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय मंत्री तसेच केंद्रीय एजन्सीच्या अधिकार्‍यांची भेट घेतली. त्यानंतर ‘आपलं महानगर’शी दूरध्वनीवरून बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, मी केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांची भेट घेतली. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून ईडी आणि आयकर विभागाकडे तक्रार करणे गरजेचे असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी सांगितल्याचे सोमय्या म्हणाले.

२१ मार्च २०१४ला ठाकरे आणि वायकर कुटुंबियांनी अन्वय नाईक यांची रायगड जिल्ह्यातील कोलाई गावची जमीन घेण्याचा निर्णय घेतला आणि २९ एप्रिल २०१४ रोजी जमीनीबाबतचे रजिस्ट्रेशन पूर्ण केले. पण २९ एप्रिल २०१४ ते ११ नोव्हेंबर २०२० पर्यंत या जमीनीचा कोणताही कर भरलेला नव्हता. तसेच सहा वर्षांपासून ९.३५ एकर जमीन अन्वय नाईक यांच्याच नावावर होती. त्यामुळे सहा वर्षांहून अधिक काळ ही बेनामी मालमत्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दाखवली नसल्याने याबाबतची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मी काही दिवसांपूर्वी केली होती. त्या तक्रारीच्या अनुषगांने लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर होईल, असा गौप्यस्फोट किरीट सोमय्या यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना केला.

उद्धव ठाकरे यांनी मालमत्तेच्या व्यवहारातील योग्य माहिती आपल्या विधानसभा निवडणुकीच्या अ‍ॅफिडीव्हेटमध्ये दाखल केली नाही. त्याबाबतची सुनावणी येत्या आठवण्यात केंद्रीय निवडणुक आयोगासमोर होणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी जमिनीचे व्यवहार, बंगले लपवले याबाबतची तक्रार मी निवडणूक आयोगाकडे केली होती. पुढील आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी असणार आहे. सहा वर्षे संपत्ती बेनामी राहिल्याने ईडीदेखील कारवाई करू शकते असे ते म्हणाले. वर्ष २०१४ ते २०२० या कालावधीत ही मालमत्ता अन्वय नाईक यांच्याच नावे होती. पण या संपत्तीचे मालक हे उद्धव ठाकरे होते. अ‍ॅफिडीव्हेटमध्ये माहिती लपवून उद्धव ठाकरे यांनी मतदारांना अंधारात ठेवल्याचा आरोप सोमय्यांनी केला. म्हणूनच या प्रकरणात आयकर आणि ईडी विभागाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात राज्यपालांचीही भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले.


हेही वाचा – बाळासाहेब ठाकरे पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम : महापौरांसह उद्योगमंत्र्यांनी घेतला आढावा