महागाईचा भडका! सीएनजी ४, तर पीएनजी ३ रुपयांनी महागला

वाढत्या महागाईने जनता त्रस्त झालेली असताना महानगर गॅस लिमिटेडने मंगळवारी सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत सीएनजी ४ रुपयांनी तर पीएनजी ३ रुपयांची महाग झाला आहे. यामुळे मुंबईत सीएनजीसाठी प्रति किलो ८० रुपये, तर पीएनजीसाठी ४८.५० रुपये मोजावे लागणार आहेत. स्थानिक पातळीवरील गॅस पुरवठ्यामध्ये तुटवडा निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे महानगर गॅस लिमिटेडने सांगितले आहे. सीएनजी, पीएनजीचे हे वाढलेले दर मंगळवार मध्यरात्रीपासून लागू केले जाणार आहेत.

महानगर गॅस लिमिटेडने यासंबंधी एक परिपत्रक जारी केले आहे. देशांतर्गत वाढत्या किमतीचे परिणाम एमजीएच्या उत्पादन किमतीवर होत असल्याने सीएनजी आणि पीएनजीच्या किमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला, मात्र या वाढत्या दराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.

अनेक वाहनचालक पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सीएनजी वाहनांना प्राधान्य देत आहे. पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत सीएनजीचे दर सर्वात कमी आहेत. मुंबईत सीएनजीचे दर २९ एप्रिलमध्ये वाढले होते. त्यावेळी सीएनजीचे दर चार रुपयांनी वाढले. त्यानंतर पुन्हा सीएनजीचे दर वाढले आहेत.