घरमहाराष्ट्रPower Demand: वाढत्या विजेच्या मागणीचे आव्हान, महानिर्मितीचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार - संजय...

Power Demand: वाढत्या विजेच्या मागणीचे आव्हान, महानिर्मितीचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार – संजय खंदारे

Subscribe

कोरोनानंतरची उद्योगांची विजेची मागणी, अर्थव्यवस्थेला आलेला वेग आणि वातावरणीय बदल याचा परिणाम हा विजेच्या मागणीवर झालेला आहे. देशात सध्या कोळशाच्या परिस्थितीवरून अनेक राज्यात वीज निर्मितीवर मर्यादा आल्या आहेत. पण देशात स्थानिक कोळशाची उपलब्धतता आणि रेल्वे वॅगॉन्सचा तुटवडा आगामी दोन वर्षांसाठी असतील. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या अधिक विजेची मागणी असणाऱ्या राज्यात विजेच्या मागणीचा ताळमेळ घालण्यासाठी काही अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन अशा उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी व्यक्त केले. महानिर्मितीने अतिशय मर्यादित कोळशातही विजेच्या निर्मितीत सातत्य ठेवले आहे. महत्वाचे म्हणजे यापेक्षाही अधिक संकटाच्या काळात महानिर्मितीने चोख जबाबदारी पार पाडत राज्याची विजेची गरज भागवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना

अल्पकालीन उपाययोजनांमध्ये महानिर्मितीला कोळशाची उपलब्धतता ही प्रत्येक विजेच्या संचाच्या ठिकाणी वाढवणे हे उदिष्ट असणार आहे. त्याअनुषंगाने विविध यंत्रणांशी समन्वय साधत प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. मध्यमकालीन उपाययोजनांमध्ये महानिर्मितीचे १०० ते ५०० मेगावॉट सौरऊर्जा क्षमतावाढीचे नियोजन आगामी वर्षात आहे. तर आगामी तीन वर्षात एनटीपीसी यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीसोबत १ हजार मेगावॉट सौरऊर्जा क्षमतावाढीचे उदिष्ट महानिर्मितीने ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले. बायो फ्युएलच्या माध्यमातूनही येत्या काळात २ ते ३ टक्के विजेच्या मागणीत क्षमतावाढीचा प्रकल्प असल्याचे खंदारे यांनी स्पष्ट केले. आगामी वर्षभरात ६६० मेगावॉटचा वीज निर्मिती संच हा भुसावळ येथे वीज निर्मिती सुरू करेल. त्याचवेळी बाद करण्यासाठीच्या इतर संचाबाबतही वाढती विजेची मागणी पाहता विचार करावा लागेल असेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत विजेच्या मागणीच्या कालावधीचा पॅटर्न हा सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेतील विजेची सर्वोच्च मागणी असा होता. पण आता मात्र विजेच्या मागणीत वेगवेगळ्या वेळेतही वाढ होत असताना दिसते आहे.

- Advertisement -

देशांतर्गत कोळशाच्या मर्यादा पाहता केंद्रातून कोळसा आयात करण्यासाठीची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे महानिर्मितीही १० टक्के आयातीच्या कोळशाच्या माध्यमातून कोळशाच्या उपलब्धतेत वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महानिर्मिती मॉन्सूनच्या कालावधीत कोळसा साठवणुकीच्या समस्येवर सध्या नियोजन करत आहे. अधिकाधिक कोळसा साठवणुकीचे नियोजन सध्या सुरू आहे. जेणेकरून सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत रब्बी हंगामातील विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठीचे आमचे नियोजन असणार आहे. त्यामुळे या काळात राज्यातील विजेच्या मागणीचा ताळमेळ घालणे शक्य होईल.

चंद्रपूर संचाची विक्रमी कामगिरी

राज्यात उन्हाळ्याची तीव्रता व त्या अनुषंगाने विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत असताना महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने अतिशय मोलाची कामगिरी बजावत गेल्या २३ दिवसांपासून तेथील सातही संचांमधून अखंड वीजनिर्मिती साध्य करीत आजवरची विक्रमी कामगिरी केली आहे. सद्यःस्थितीत चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची स्थापित क्षमता २,९२० मेगावॅट इतकी आहे. चंद्रपूर येथे ५०० मेगावॅटचे एकूण ५ संच (संच क्र. ५ ते ९) व २१० मेगावॅटचे २ संच कार्यरत असून दि. ४ एप्रिलपासून आजतागायत या सातही संचांमधून गेले २३ दिवस सलग अहोरात्र वीजनिर्मिती सुरु आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -