मुंबई : दरवर्षी साधारणपणे दिवाळीच्या सुमारास थंडीला सुरुवात होते. मात्र, यावेळी उशिराने थंडीला सुरुवात झाली. असे असले तरी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस किमान तापमानात अतिशय वेगाने घसरण होताना दिसत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे राज्यात थंडीचा जोर वाढला असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. याचपार्श्वभूमीवर येत्या तीन दिवसात राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. (Cold wave warning for some districts of the state in the next three days)
हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तरेकडून हिमालयाच्या दिशेने येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढला आहे. त्यामुळे कोरड्या हवेचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होताना दिसून येत आहे. परिणामी येत्या तीन दिवसात राज्यातील थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. विशेषकरून मध्य महाराष्ट्रात तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण होणार आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांमधील कमाल आणि किमान तापमानात वेगाने घसरण होत आहे. प्रामुख्याने घाटमाथ्यावर धुक्याची चादर दिसू लागली आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस थंडीच्या तापमानात घट होत असल्यामुळे नागरीकांना आता गुलाबी थंडीचा अनुभव घेता येणार आहे.
हेही वाचा – Ambadas Danve on Congress : कॉंग्रेसचा अतिआत्मविश्वास आम्हाला नडला; काय म्हणाले दानवे
राज्यातील तापमानावर नजर टाकली तर मागील दोन दिवसात राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद निफाडमध्ये झाली आहे. निफाडमध्ये 8.3 अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. यानंतर पुण्यात किमान तापमान 9.9 अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. उन्हाळ्यात प्रचंड तापणाऱ्या विदर्भात देखील कमी तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील गोंदियात किमान तापमान 11.4 अंश सेल्सिअस आहे, नागपूरमध्ये 11.8 अंश आहे. याशिवाय हवामान विभागाने पुणे, धुळे, नाशिक, जळगाव या जिल्ह्यात थंडीची लाट अधिक तीव्र राहील, असा इशारा दिला आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरात देखील नागरीक रात्रीच्या वेळी रस्त्यांवर ठिकठिकाणी थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. विशेषकरून बांधकामाच्या ठिकाणी मजूर, कष्टकरी शेकोट्या पेटवत आहेत. तसेच थंडाचा जोर वाढल्यामुळे दिवसाही काही जण गरम कपड्यांचा आधार घेत आहेत.
हेही वाचा – Politics : नाना पटोलेंचे निवडणूक आयोगावर आरोप; धनंजय मुंडे म्हणतात, विरोधकांचा भाबडेपणा…