आठवडाभरात मुंबईत थंडीचा जोर आणखी वाढणार

येत्या दिवसांत शीतलहरी आणखी वाढणार असून, तापमानाचा पारा हा 14 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. असे झाल्यास यंदाच्या हिवाळ्यातील मुंबईतील हे सर्वात नीचांकी तापमान ठरेल

मुंबई : शहरात येत्या आठवडाभरात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. शहराचे तापमान येत्या आठवड्यात 14 अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यंदाच्या हिवाळ्यातील शहरातील आतापर्यंतचे नीचांकी तापमान हे 15 अंश सेल्सिअस होते. 25 डिसेंबर 2022 रोजी नाताळ सणानिमित्त शहरात हिवाळ्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर आता नव्या वर्षात मकर संक्राती सणाच्या आठवड्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

येत्या दिवसांत शीतलहरी आणखी वाढणार असून, तापमानाचा पारा हा 14 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. असे झाल्यास यंदाच्या हिवाळ्यातील मुंबईतील हे सर्वात नीचांकी तापमान ठरेल. केवळ मुंबईच नव्हे तर राज्यभरातील बहुतांश ठिकाणी तापमान घटले असून, गुलाबी थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत. राज्यात 10 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईचे तापमान या आठवड्यात सरासरी 20 ते 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. पुढील दोन दिवस सरासरी किमान तापमान हे 16-17 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तर सोमवारी तापमान 14 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

थंडीमुळे आजारांमध्ये वाढ होणार?
वाढत्या थंडीमुळे प्रदुषणात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत असून यामुळे विविध आजारांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. हिवाळा सुरू होताच शहराची हवा बिघडली आहे. प्रदूषणात वाढ झाल्याने हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक अनेकदा धोकादायक पातळीवर जात असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. वाढत्या थंडीमुळे अनेक नागरिकांना घसा खवखवणे, टॉन्सिल्स, खोकला, सर्दी आणि ताप यांसारख्या आजारांची लागण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढणार असल्याने या आजारांमध्येही वाढ होण्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे.


हेही वाचाः आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ, मालमत्तेची प्रत्यक्ष चौकशी सुरू