घरमहाराष्ट्रराज्याच्या विकासासाठी कटिबद्ध; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही  

राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही  

Subscribe

आगामी काळात जे करार होतील त्यांची १०० टक्के अंमलबजावणी होईल. राज्याच्या औद्योगिक धोरणात बदल झाला आहे. यामुळे विदेशी गुंतवणूकही वाढेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला

मुंबई : माझ्यावर होत असलेल्या आरोपांचे उत्तर मी कामातून देईल. मी २०२४ मध्ये मुख्यमंत्री होईन का ते सांगता येत नाही. याबाबत  लोकं ठरवतील. मी  राज्याच्या विकासासाठी कटीबध्द आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिली. मी आजही सामान्य माणूस आहे. मी मालमत्ता वाढविण्यासाठी येथे आलेलो नाही,असा टोलाही  शिंदे यांनी लगावला.

सांताक्रूझ परिसरातील हॉटेल ग्रॅंड हयात येथे आयोजित ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’ कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी राज्य शासनाच्या विकासात्मक प्रकल्पांची माहिती दिली. राज्यातील औद्योगिक प्रकल्पांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली असून, यापुढे महाराष्ट्रात मोठमोठे प्रकल्प दिले जातील, चिंता करू नका, असे आश्वासन दिले आहे. औद्योगिक सामंजस्य करारांची अंमलबजावणी झाली पाहिजे. नुसते करार करून चालणार नाही. आगामी काळात जे करार होतील त्यांची १०० टक्के अंमलबजावणी होईल. राज्याच्या औद्योगिक धोरणात बदल झाला आहे. यामुळे विदेशी गुंतवणूकही वाढेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग लवकरच सुरू होईल. हा गेमचेंजर प्रकल्प ठरणार आहे. महामार्गालगत नवनगर, नोडस, नॉलेज सिटीज उभारण्यात येत आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. प्रक्रिया उद्योगही सुरू होईल. समृद्धीचा शिर्डीपर्यंतचा मार्ग खुला केला जाणार आहे. पुढच्या वर्षात समृद्धी महामार्ग पूर्णपणे सुरू केला जाईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे ठाणे, रायगड,संभाजीनगर येथे उद्योग आहेत. आता महामार्गाजवळ सुद्धा उद्योग वाढत आहेत. या महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आणि सर्वच क्षेत्रात समृद्धी येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
मुंबई-पुणे मिसिंग लिंक तयार करणार
यापूर्वी राज्यात मेट्रो, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेची निर्मिती झाली.  आता मुंबई-पुणे मिसिंग लिंक तयार करतोय. या मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे मधील प्रवासासाठीचा वेळ २० मिनिटांनी कमी होईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

दोन वर्षांत खड्डेमुक्त मुंबई
मुंबईत दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्याचे  काम केले जात आहे. निविदा प्रकियेला सुरूवात झाली आहे. सुमारे ५ हजार ५०० कोटी रूपयांचे काँक्रीट रस्ते दोन वर्षात पूर्ण करण्याचे  निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. येत्या काळात मुंबईचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, असा विश्वास  मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबईच्या विकासात भर घालणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) चे काम प्रगतीपथावर आहे. हा २२ किमीचा देशातील सर्वात लांब सी-लिंक आहे. त्याचे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासह नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी केली जात असून शहरात मेट्रोचे जाळे निर्माण केले जात आहे. प्रमुख शहरांमध्ये सुमारे ३४० किलोमीटरची मेट्रो उभारण्यात येत असून २०२७ पर्यंत काम पूर्ण होईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी  दिली.

आमचे लोकाभिमुख, विकासाभिमुख सरकार असेल. गेल्या तीन महिन्यात जनतेच्या हिताचे चांगले निर्णय घेतले. पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करून जनतेला दिलासा दिला. नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्तांना एनडीआरएफच्या निकषांपेक्षा जास्त मदत केली. देशात सर्वात जास्त पायाभूत सुविधांचे काम महाराष्ट्रात सुरू आहे. राज्यात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केले जात आहेत. राज्य सरकार  विकास कामांच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत आहे. हे जनतेचे सरकार आहे. सण आणि उत्सव आता उत्साहात साजरे केले जात आहेत. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेली राज्याची अर्थव्यवस्था सुधारते आहे. राज्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -