Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र गिरणी कामगारांच्या घरांसाठी समिती; ठाकरे गटाच्या आमदारांना डावलले

गिरणी कामगारांच्या घरांसाठी समिती; ठाकरे गटाच्या आमदारांना डावलले

Subscribe

मुंबई : गिरणी कामगारांची (Mill worker) पात्रता तपासणे, सोडत काढणे, सोडतीत यशस्वी ठरलेल्या गिरणी कामगारांना सदनिका, घरांचा ताबा वेळेत मिळणे या बाबींवर सनियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना स्थान देण्यात आलेले नाही. या समितीत भाजपाच्या (BJP) तीन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या एका आमदाराचा समावेश करण्यात आला आहे.

सन १९८२मधील गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपानंतर मुंबईतील ५८ गिरण्या बंद पडल्या. या गिरण्यांची मोकळा जागा आणि शिल्लक चटई क्षेत्रापैकी एक तृतीयांश जागा महापालिका, एक तृतीयांश जागा म्हाडा तर एक तृतीयांश जागा गिरणी मालकांना देण्याचा निर्णय झाला. या बंद पडलेल्या गिरण्यांच्या जमिनीवर म्हाडामार्फत घरे बांधून गिरणी कामगारांच्या घरांची लॉटरी काढण्यात आली. या घरांसाठी १ लाख ७४ हजार गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी अर्ज केले होते. या गिरणी कामगारांच्या घरांसाठी २०१०, २०११ आणि २०१७मध्ये सोडत निघाली. म्हाडाच्या ताब्यातील जागेवर गिरणी कामगारांच्या १३ हजार ४५३ घरांसाठी आणि एमएमआरडीएकडून रेंटल हौसिंग योजनेअंतर्गत २ हजार ४१७ जोड सदनिकांची सोडत म्हाडामार्फत काढण्यात आली. त्यामुळे अजून १ लाख ५८ हजारांहून अधिक कामगार हक्काच्या घरापासून वंचित राहिले आहेत.

- Advertisement -

गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्याचा निर्णय होऊनही कामगारांना अद्याप घरे मिळालेली नाहीत. शिवाय गिरणी कामगारांची पात्रता निश्चित झालेली नाही. त्यामुळे गिरणी कामगारांची पात्रता तपासण्याबरोबर सोडत काढणे, सोडतीत घर लागलेल्या कामगारांना घरांचा ताबा देण्यासाठी राज्याच्या गृहनिर्माण विभागाने भाजपा आमदार सुनील राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीत भाजपा आमदार कालिदास कोळंबकर, शिवेंद्रसिंह भोसले आणि शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

या समितीमधून गिरणगावातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदारांना डावलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नांच्या संदर्भात आमदार अजय चौधरी आणि विधान परिषद सदस्य सुनील शिंदे यांनी वेळोवेळी विधिमंडळात आवाज उठवला आहे. गिरणी कामगारांचे प्रश्न सतत या आमदारांनी मांडले. पण तरीही गिरणी कामगारांच्या प्रश्नांची जाण असलेल्या आमदारांना समितीमधून डावलले. यापूर्वी आरेच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन केलेल्या समितीमधून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्थानिक आमदार रवींद्र वायकर यांना डावलले होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -