फेसबुकवर बनावट अकाउंट बनवून केली फसवणूक

खासगी कंपनीत काम करणाऱ्या जुन्या सहकाऱ्याने तरुणीचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून तिच्या मित्रांना अश्लील मेसेज केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन तरुणांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे.

facebook
फेसबुकवर बनावट अकाउंट

खासगी कंपनीत काम करणाऱ्या जुन्या सहकाऱ्याने तरुणीचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून तिच्या मित्रांना अश्लील मेसेज केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन तरुणांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेप्रकरणी २३ वर्षीय तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निरजकुमार, सुरेशचंदकुमार आणि सुरेंद्रकुमार बाबूसिंग कुशवाह या आरोपींना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे ही मूळचे उत्तर प्रदेश येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ओळखीच्यांनीच केली फसवणूक 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय तरुणी ही चिखली येथील एका खासगी कंपनीत कामाला आहे. तेथे आरोपी निरजकुमार आणि सुरेंद्रकुमार हे काम करत होते. तरुणी आणि आरोपी यांची ओळख असून ते मित्र होते. परंतु, कालांतराने दोन्ही आरोपींनी नोकरी सोडली. याच कालावधीत नीरजकुमार आणि त्यांचा साथीदार सुरेंद्रकुमार यांनी तरुणीच्या नावाने फोटोसह बनावट फेसबुक अकाउंट तयार केले. फिर्यादी तरुणीच्या मित्रांना त्याने बनावट फेसबुक अकाउंट वरून ‘मी तुझ्यावर प्रेम करते’ यासह अनेक अश्लील मेसेज केले. याविषयी संबंधित मित्राने तुझ्या अकाउंट वरून अश्लील मेसेज आल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर कोणीतरी बनावट अकाउंट तयार केल्याचे उघड झाले. हा प्रकार तब्बल एक महिना सुरू होता. तरुणीने थेट चिखली पोलीस ठाणे गाठत याविषयी माहिती दिली. त्यात हे दोन ओळखीचे आरोपीसमोर आले असून त्यांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे.