अपघातग्रस्त कारचा विमा नाकारल्याने कंपनीला ग्राहक न्यायालयाचा दणका

Jharkhand15 people sentenced to death by Jharkhand court for killing jail inmate

नाशिक : जुन्या अपघातग्रस्त कारचा इन्शुरन्स क्लेम केला असता तो नाकात ग्राहकाची गैरसोय करणार्‍या एका विमा कंपनीला ग्राहक न्यायालयाने 1 लाख 24 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स लिमिटेड कंपनी असे या शिक्षा झालेल्या विमा कंपनीचे नाव असून, ग्राहक न्यायालयाने संबंधित कारमालक तक्रारदाराला विमा दाव्यापोटी ही रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत ग्राहक न्याय मंचने दिलेल्या माहितीनुसार, भगवान गायके (रा. येवला, जि. नाशिक) यांनी ग्राहक न्याय मंचाकडे दावा दाखल केला होता. गायके यांनी गावित या व्यक्तीकडून जुनी कार विकत घेतली होती. मूळ कारमालकाने 22 ऑक्टोबर 2020 ते 22 ऑक्टोबर 2021 असा 1 वर्षांचा विमा काढला होता. वाहन नावावर करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून ते औरंगाबाद प्रादेशिक परिवहन विभागात जमा करण्यात आले होते. गायके यांना प्रादेशिक परिवहन विभागाकडून मोबाईलवर ‘अंडर प्रिपरेशन’ असा संदेशही आला होता. त्यानंतर ते आपले वाहन घेऊन औरंगाबादकडे निघाले. रस्त्यात सर्विस रोडवर वाहन उभे करून ते कामानिमित्त गेले असता एका दुचाकीने त्यांच्या कारला धडक दिली.
या अपघाताने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यानंतर गायके यांना त्यांच्या पत्त्यावर आरसी बूक मिळाले. त्यापूर्वी गायके यांनी कार दुरुस्तीसाठी येणारा खर्च 2 लाख 55 हजार विमा दावा दाखल केला होता. विमा कंपनीने तांत्रिक कारणे सांगत विमा नाकारला होता.

ग्राहक न्याय मंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य सचिन शिंपी, प्रेरणा काळुंखे यांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकत विमा कंपनीला 1 लाख 24 हजार रुपये तक्रारदारास देण्याचे आदेश दिले. तक्रारदार यांच्या वतीने अ‍ॅड. कोनिका जाधव यांनी युक्तीवाद केला. विमा कंपनीच्या वतीने अ‍ॅड. शशिकला पूर्णपात्रे यांनी कामकाज पाहिले.

काय होती तक्रार ?

गायके यांनी जुनी कार घेतली तेव्हा पूर्वीच्या मालकाने एक वर्षाचा विमा काढला होता. आरसी बूक ही गायके यांच्या नावाने यायला वेळ लागला. विमा कंपनीने आरसी वेळेत मिळाले नाही, म्हणून विमा नाकारला. परंतु, हे चुकीचे ग्राह्य धरून न्याय मंचाने विमा कंपनीचा युक्तिवाद फेटाळून लावला.