मुंबई : जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत धो-धो बरसणाऱ्या पावसाने अचानक ओढ दिल्याने राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा ऑगस्टमध्ये शतकातील सर्वात कमी पावसाची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर शासनाने या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
महाराष्ट्रात हा पावसाळा कोरडा गेल्यामुळे मोठी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुतेक धरणांनी तळ गाठला असून हाताशी आलेली पिके गेली आहेत. शासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. जरी राज्यातील काही ठिकाणी…
— Supriya Sule (@supriya_sule) September 4, 2023
ऑगस्ट महिन्यांत देशात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. या महिन्यात केवळ 160 मि.मी. एवढाच पाऊस पडला आहे. ऑगस्ट 2023 हा 1901 नंतरचा सर्वात कोरडा ऑगस्ट महिना म्हणून नोंदवला गेला आहे. त्यामुळे यंदा दुष्काळाची स्थिती ओढावली आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 22 टक्के तर, मराठवाड्यात सरासरीच्या 19 टक्के पावसाची तूट असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
हेही वाचा – Vistara airlines : अंध महिलेला खूप वेळ विमानात बसवून ठेवले, नंतर व्यक्त केला खेद!
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केले आहे. महाराष्ट्रात हा पावसाळा कोरडा गेल्यामुळे मोठी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुतेक धरणांनी तळ गाठला असून हाताशी आलेली पिके गेली आहेत. शासनाने या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – …तर मी राजकारणातून बाजूला होईन; विरोधकांच्या ‘त्या’ आरोपावर अजित पवारांकडून खुलं आव्हान
राज्यातील काही ठिकाणी नुकताच पाऊस झालेला असला तरी तो पुरेसा नाही. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान खूप मोठे आहे. ही दुष्काळी परिस्थिती असून आगामी काळात ती आणखी भीषण होण्याची शक्यता आहे. वाड्यावस्त्यांवर पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची अतिशय कठिण परिस्थिती आहे. हे लक्षात घेता राज्य शासनाने तातडीने चारा छावण्या आणि टॅंकर सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.