वडाच्या झाडाच्या फांद्या तोडणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार; पालिका करणार गुन्हा दाखल

मुंबईत 'वटपौर्णिमा' महिला मंडळींनी धुमधडाक्यात साजरी केली. मात्र या वटपौर्णिमेच्या निमित्ताने धारावी, शाहूनगर येथे अज्ञात व्यक्तींनी वडाच्या झाडांच्या फांद्यांची बेकायदेशीरपणे छाटणी केल्याने पालिका उद्यान खात्याकडे तशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुंबईत ‘वटपौर्णिमा‘ महिला मंडळींनी धुमधडाक्यात साजरी केली. मात्र या वटपौर्णिमेच्या निमित्ताने धारावी, शाहूनगर येथे अज्ञात व्यक्तींनी वडाच्या झाडांच्या फांद्यांची बेकायदेशीरपणे छाटणी केल्याने पालिका उद्यान खात्याकडे तशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता पालिकेच्या जी/ उत्तर विभाग (BMC) कार्यालयातील उद्यान खात्यामार्फत मंगळवारी शाहूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. (Complaint against person who cut the branches of banyan tree bmc will file a case)

यासंदर्भातील माहिती, जी/ उत्तर विभागातील उद्यान खात्याच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यास संबंधित गुन्हेगाराला शोधून त्याच्यावर नियमाने दंडात्मक कारवाई व तुरूंगात पाठविण्याची कारवाई केली जाऊ शकते.

दोषी व्यक्तींवर कडक कारवाई

भाजपचे पालिकेतील माजी गटनेते व माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी वटपौर्णिमेनिमित्ताने दरवर्षी होणारी वडाच्या झाडांच्या फांद्यांची कत्तल पाहता पालिकेने संबंधित दोषी व्यक्तींवर यंदा कडक कारवाई करावी, अशी मागणी पालिकेकडे केली होती. तर, पालिका प्रशासनानेही त्यास प्रतिसाद देत वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या झाडाच्या फांद्या तोडल्यास संबंधित व्यक्तींवर किमान १ ते ५ हजार रुपये दंड तसेच किमान १ आठवडा ते १ वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, असा इशारा मुंबई महापालिका प्रशासनाने वृक्षतोड करणाऱ्या नागरिकांना दिला होता.

अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल

दरम्यान, पालिकेच्या जी/ उत्तर विभाग कार्यालयातील उद्यान विभागाकडे एका तक्रारदार व्यक्तीने धारावी, शाहूनगर येथे वडाच्या झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे मंगळवारी शाहूनगर पोलीस ठाण्यात पालिकेकडून अधिकृत तक्रार साहाय्यक आयुक्त यांच्या मान्यतेने दाखल करण्यात येणार असल्याचे उद्यान खात्याचे उप उद्यान अधिकारी यांनी सांगितले.

तक्रार दाखल केल्यावर वडाच्या फांद्या कोणी तोडल्या याचा शोध पोलीस घेतील व ते त्या संबंधित गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई करतील,असे सदर अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.


हेही वाचा – वटपौर्णिमेदिवशी सोने-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर?