‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या विरोधात बोलणे आव्हाडांना भोवले, पोलिसांत तक्रार दाखल

'द केरला स्टोरी' या चित्रपटाच्याविरोधात बोलणे जितेंद्र आव्हाड यांना चांगलेच महागात पडले आहे. कारण या प्रकरणावरून आता त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Complaint filed against Jitendra Awad for speaking against movie 'The Kerala Story'

‘द केरला स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पण तरी देखील प्रेक्षकांकडून या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात तर हा चित्रपट करमुक्त (टॅक्स फ्री) करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. काही राज्यांनी या चित्रपटावर बंदी घातली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटात दाखवण्यात आलेली माहिती खोटी असल्याचा आरोप केला आहे. याबाबतचे ट्वीट करत त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली. पण आता या चित्रपटाच्याविरोधात बोलणे जितेंद्र आव्हाड यांना चांगलेच महागात पडले आहे. कारण या प्रकरणावरून आता त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (Complaint filed against Jitendra Awad for speaking against movie ‘The Kerala Story’)

हेही वाचा – “…’हा’ सिनेमा टॅक्स फ्री करून दाखवा”, जितेंद्र आव्हाडांचे राज्य सरकारला आव्हान

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात काही लोकांनी ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आव्हाड यांनी ट्वीट करत याची माहिती दिली. चित्रपटाची बदनामी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे आव्हाड यांनी सांगितले. त्यांनी या ट्वीटच्या माध्यमातून DRDOचे संस्थापक प्रदीप कुरुलकर यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. जो एका बाईसाठी देश विकतो, तोच पुण्यामध्ये सावरकर व्याख्यानमालेत देशभक्तीचे भाषण देतो, याला आपण काय म्हणाल? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट…
जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होताच त्यांनी याबाबतची माहिती देत ट्वीट करत लिहिले की, “चित्रपटाची बदनामी केली म्हणून काही भक्तांनी वर्तकनगर पोलीस स्टेशन येथे माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि गुन्ह्यामध्ये म्हटलं आहे की द केरला स्टोरी या चित्रपटाची जितेंद्र आव्हाड यांनी बदनामी केली. माझा प्रश्न असा आहे की, कुरुलकर या अतिशय महत्वाच्या जागी असलेल्या संशोधकाने या देशाची अत्यंत गुप्त माहिती पाकिस्तानला दिली. तो कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या राज्याचा प्रतिनिधी नाही तर तो गद्दार आहे. आता कुरुलकरवर बोललो म्हणजे मी कुठल्या जातीबद्दल बोललो असे होत नाही. किंवा कुठल्या धर्माबद्दल बोललो असे होत नाही. विकृतीला गद्दारीला आणि आतंकवादाला धर्म, जात, पंथ.राज्य .राष्ट्र
नसते .हे यावरुन तरी आपल्या लक्षात येईल. कुरुलकरचे मूळ आणि कुळ शोधा मग कळेल आपल्याला.

नशीबाने द केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित व्हायला आणि कुरुलकरने एका बाईसाठी देश विकायला एकच वेळ आली. यालाच योगायोग म्हणतात. हाच कुरुलकर पुण्यामध्ये सावरकर व्याख्यानमालेत देशभक्तीचे व्याख्यान देत होता. आता याला आपण काय म्हणाल ? याच्या नावाने कोणती फाईल्स किंवा कोणत्या स्टोरीचा चित्रपट बनवायचा. आतामात्र ट्रोलर्स आणि माझ्यावर आग ओकणारे तोंडावर बोट ठेवून आज दिवसभर शांत राहतील. ज्यांच्या डीएनएमध्येच गद्दारी आहे, फितुरी आहे ते आम्हांला काय अक्कल शिकवणार. ह्याला इतिहासच साक्ष आहे.” आव्हाड यांच्यावर आधीच वेगवेगळ्या कारणास्तव गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या गुन्ह्यांच्या यादीत आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे.

दरम्यान, “आम्ही शाहिरांचे सिनेमे दाखवून प्रेम, संस्कृती पसरवू हिम्मत असेल तर महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा टॅक्स फ्री करून दाखवा”, असे आव्हान जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्वीटद्वारे राज्य सरकारला केले आहे. देशात ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमावरून वाद सुरू आहे. या सिनेमावरून देशभरात राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे.