घरमहाराष्ट्रनाशिकमालेगावात पूर्णतः लॉकडाऊन

मालेगावात पूर्णतः लॉकडाऊन

Subscribe

धोका वाढला; अत्यावश्यक सेवांनाही वेळेचे निर्बंध

राज्यातील इतर शहरात लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली जात असताना कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या मालेगाव शहरात व ग्रामीण भागात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता शहरात पूर्णतः संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसे आदेश उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा यांनी निर्गमीत केले आहेत. अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार असल्याने नागरिकांनी घरात थांबून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला असून लॉकडाऊन वाढवताना रेड झोनमध्ये मात्र कोणतीही शिथिलता आणलेली नाही. मालेगावमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नाशिक जिल्हा रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे शासनाने मुंबई, पुण्यानंतर मालेगावकडे लक्ष केंद्रीत केले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मालेगाव करोनामुक्तीचा निर्धार करत मालेगाव दत्तक घेतले आहे. टोपे यांनी दोन वेळा मालेगावला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. मालेगावमध्ये कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने उपविभागीय अधिकारी शर्मा यांनी काही निर्बंध अधिक कडक केले आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव व प्रसार होऊन धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मालेगाव शहरात पूर्णत: संचारबंदी करणे अनिवार्य आहे. तसेच अपर पोलीस अधीक्षक यांनी सादर केलेला अहवाल पूर्णत: संचारबंदी लागू करण्याबाबत त्यांनी विनंती केली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण मालेगाव शहराच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंडसंहिता प्रक्रिया कलम 144 (1) (3) अन्वये कोणत्याही व्यक्तीला रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर, गल्लीत संचार करणे, वाहतूक करणे, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्यास मनाई करणारा आदेश काढला आहे. यात अत्यावश्यक आरोग्य सेवा व कायदा सुव्यवस्थेसाठीचे मनुष्यबळ अपवाद असतील, असेही शर्मा यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

या सेवांसाठी वेळेचे निर्बंध

महापालिका हद्द व ग्रामीण भागातील कंटेन्मेंट झोन वगळता अत्यावश्यक सेवांना वेळ ठरवून देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मेडिकल्स, रुग्णालये, दुध व दुग्धोपादने पुरवठा करणारे विक्रेते, गॅस पुरवठा करणार्‍या गॅस एजन्सीज, चारा पुरवठा करणारे विक्रेते, किराणा दुकाने यांना सकाळी 7 ते दुपारी 2 व सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. केवळ हातगाडीवरून फळांची विक्री करणारे विक्रेते सकाळी 7 ते 2 या वेळेत फळांची विक्री करु शकतात. त्याचप्रमाणे मालेगाव शहरातील प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेन्मेंट एरिया) वगळता इतर भागातील सर्व बँका सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत संचारबंदीच्या आदेशातून वगळण्यात आले आहे.

हे पेट्रोलपंप राहणार सुरू

पोलीस विभाग, महसूल विभाग, महानगरपालिका, आरोग्य विभागासह इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच खासगी डॉक्टर व त्यांच्या आस्थापनेवरील स्टाफ यांना पेट्रोल, डिझेल पुरवठा करण्यासाठी निर्धारित केलेल्या पोलीस दक्षता पेट्रोलपंप, रावळगाव नाका, मालेगाव कॅम्प; मुतल्लिक पेट्रोलपंप, दरेगाव, बालाजी पेट्रोलपंप, सोयगाव, उदयराज ऑटोमोबाईल्स, पेट्रोलपंप, मालेगाव कॅम्प; नॅशनल पेट्रोलपंप, दरेगाव रोड, मालेगाव; एम. जी. पेट्रोलपंप, नवीन तहसीलच्या पाठीमागे, मालेगाव; ए. आर. पेट्रोलपंप, स्टार हॉटेलशेजारी, मालेगाव हे सात पेट्रोलपंप सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. तर शहरी हद्दीपासून 2 किलोमीटर परिघातील इतर सर्व पेट्रोलपंप बंद राहतील.

- Advertisement -

यांना वगळले…

त्याचप्रमाणे मालेगाव शहरातील प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेन्मेंट एरिया) वगळता इतर भागातील सर्व बँका सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत संचारबंदीच्या आदेशातून वगळण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार टाळण्यासाठी कार्यरत संबंधीत आपत्ती निवारण व्यवस्थापन (महसूल विभाग, पोलीस, आरोग्य विभाग, मालेगाव महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी) यांना यातून वगळण्यात आले आहे. मात्र, त्यांनी स्वत:चे ओळखपत्र सोबत बाळगणे व तोंडावर मास्क लावणे बंधनकारक असल्याचेही आदेशात नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -