घरमहाराष्ट्रराज्यातील रस्ते प्रकल्प कालबद्ध वेळेत पूर्ण करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राज्यातील रस्ते प्रकल्प कालबद्ध वेळेत पूर्ण करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Subscribe

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या आणि मान्यता मिळालेल्या राष्ट्रीय महामार्ग, उड्डाण पूल, रस्ते यांच्या कामातील अडथळे दूर करून कालबद्धरित्या हे प्रकल्प पूर्ण करावेत. वनांच्या हद्दीतील अस्तित्वात असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्ती कामांसाठी वन विभागाने प्राधान्याने कार्यवाही करून ते प्रकल्प मार्गी लावावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंगळवारी येथे दिले.

राज्यातील विविध रस्ते प्रकल्प तसेच नवीन रस्ते प्रकल्पांबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी शिंदे म्हणाले, वाढते शहरीकरण लक्षात घेऊन वाढत्या पायाभूत सुविधांसाठी रस्ते, महामार्ग तसेच उड्डाणपुलांचे विविध प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू आहेत. त्याचबरोबर काही प्रस्तावित प्रकल्प जमीन संपादन तसेच वन विभागाची मान्यता यासाठी प्रलंबित आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या या प्रकल्पांना तातडीने गती देण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

जे प्रकल्प जमीन संपादनाअभावी रखडलेले आहेत त्याठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी कालमर्यादेत जमीन संपादन करावी. याकामी वेळ जात असल्याने प्रकल्पाच्या किमतीत वाढ होते. त्यामुळे लवकरात लवकर जमीन संपादन करून प्रकल्प पूर्णत्वासाठी प्रयत्न करण्यास मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील कळंबोली आणि अन्य सहा ठिकाणच्या जंक्शनच्या विकासकामांविषयी चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामासाठी सात किमीच्या जमीन संपादनाविषयी देखील चर्चा झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

- Advertisement -

प्रत्येक जिल्ह्यात स्क्रॅपिंग युनिट सुरू करा – गडकरी
केंद्र सरकारने 15 वर्षांपूर्वीची वाहने मोडीत काढण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार अशी वाहने मोडीत काढता यावीत म्हणून महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात स्क्रॅपिंग युनिट सुरू करण्याचे आवाहन केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले. मोठ्या आणि विकसित जिल्ह्यांमध्ये चार आणि लहान अविकसित जिल्ह्यात दोन अशी किमान 150 ते 200 युनिट सुरू करण्याची सूचना गडकरी यांनी यावेळी केली. यामुळे किमान 10 ते 15 हजार जणांना रोजगार मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

महामार्ग, रस्ते प्रकल्पांसाठी वेळेत जमीन संपादन करावे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देतानाच गणपतीपूर्वी एकेरी मार्गाचे काँक्रीटीकरण करावे, असेही गडकरी यांनी सांगितले.

दोन लाख कोटींचे पायाभूत प्रकल्प
राज्यात जवळपास सुमारे दोन लाख रुपये खर्चाचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. शिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत मुंबई विभागात चार, सहा आणि आठ पदरी मार्गिकांचे 9 प्रकल्पांच्या 435 किमी लांबीचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. 621 किमी लांबीचे सहा न्यू ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे, 178 किमी लांबीचे तळेगाव, चाकण, शिरूर, पुणे शिरूर, रावेत नाऱ्हे, हडपसर रावेत, द्वारका सर्कल ते नाशिक रोड स्टेशन अशा या पाच एलिव्हेटेड कॉरिडोअर्सचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. महाराष्ट्रात रस्ता सुरक्षेच्या कामांमध्ये अपघातप्रवण क्षेत्र दूर करणे, उड्डाणपूल, सर्वीस रस्ते, पादचारी पूल यांची 68 ठिकाणी कामे प्रस्तावित आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -