घर उत्तर महाराष्ट्र सिमेंटशिवाय काँक्रिटीकरण; देशातील पहिलाच पर्यावरणपूरक यशस्वी प्रयोग नाशिकमध्ये

सिमेंटशिवाय काँक्रिटीकरण; देशातील पहिलाच पर्यावरणपूरक यशस्वी प्रयोग नाशिकमध्ये

Subscribe

नाशिक : सिमेंटशिवाय काँक्रिटीकरणाची कल्पनाच कुणी करू शकत नाही. अगदी जगाच्या पाठीवर इमारती, रस्ते, पूल आणि इतर जी बांधकामांचे जे प्रकल्प सुरू आहेत, त्यातही प्रचंड प्रमाणात सिमेंटचाच वापर केला जातो. मात्र, नाशिकमध्ये प्रथमच सिमेंट शिवाय काँक्रिटीकरणाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. या प्रयोगामुळे संपूर्ण बांधकाम क्षेत्रापुढे पर्यावरणपूरक आणि स्वस्त बांधकामांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. ( For the first time in Nashik, the experiment of concreting without cement has been successful )

जगभरात कार्बन उत्सर्जन रोखण्या हेतूने अनेक प्रयोग केले जात आहेत. त्याच अनुषंगाने ग्रीन बिल्डिंगची संकल्पना (Concept of green building) सर्वच क्षेत्रात रुजू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड (Mahindra Logistics Limited)  या प्रयोगासाठी पुढाकार घेतला आणि शहरातील उद्योजक तथा माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांच्या बेळगाव ढगा येथील जेके वेअर हाऊसमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला.

- Advertisement -

ही संकल्पना जाधव यांनी यापूर्वी ऐकलेली होती. त्यामुळे संशोधक डॉ. रामकुमार नटराजन यांच्याशी संपर्क साधून नाशिक मध्येही हा प्रयोग करण्यासाठी सहकार्याची विनंती केली. त्यानंतर वेअरहाऊसच्या ८० हजार स्क्वेअर फूट क्षेत्रावर काँक्रिटीकरणासाठी तयारी सुरू झाली. त्यासाठी तामिळनाडू मधील एका उत्पादक कंपनीने यासाठी लागणारा १२ टन कच्चा माल (स्लॅग) पुरवला. स्लॅग, खडी व पाणी यांच्या मिश्रणातून काँक्रिटीकरण केले गेले. हे काँक्रिटीकरण करण्यापूर्वी नाशिकमध्ये ब्लॉक टेस्टही घेण्यात आली होती. ती यशस्वी झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुुरुवात झाली.

टाटा स्टील व इको मटेरिअल्स यांनी संयुक्तपणे हे मिश्रण तयार केले असून, त्याचे पेटंट देखील प्राप्त झाले आहे. भारतातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. यानिमित्ताने जगभरात प्रथमच सिमेंटला तितकाच श्रेष्ठ पर्याय समोर आला आहे. या प्रयोगावेळी महिंद्रा लॉजिस्टिक्सचे वरिष्ठ व्यवस्थापक सौरव रक्षित, विश्वास जाधव, पंकज रास्ते, अभिजित बिस्वास, नवोदय सायन्सचे डॉ. रामकुमार नटराजन, एन. वर्धाराजन, जे. के. वेअरहाऊसिंगचे संचालक शशिकांत जाधव, शंतनू जाधव, शुभम जाधव उपस्थित होते. या प्रयोगासाठी अमित पाटील, महेश सारंगधर, विराज इन्फ्राटेकचे अभिजित बनकर यांनी तांत्रिक साहाय्य केले. शहरात ४ सप्टेंबर २०२३ हे काँक्रिटीकरण झाल्यानंतर ६ दिवसांनी रिपोर्ट त्याची गुणवत्ता, दर्जा, वजन पेलण्याची क्षमता, काठिण्य हे सिमेंट एवढेच असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे आता सिमेंट उत्पादकांची मक्तेदारी संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

नाशिकमधील या एका प्रयोगाने तब्बल १७६ टन कार्बन उत्सर्जन रोखण्यात यश आले आहे. संपूर्ण देशभरात असे प्रयोग झाल्यास पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणावर रोखता येईल. : डॉ. रामकुमार नटराजन, संशोधक, नवोदय सायन्स

महिंद्रा लॉजिस्टिक्सने २०४० पर्यंत कार्बन उत्सर्जनमुक्त कंपनी बनण्याचा निश्चय केला आहे. त्याअनुषंगाने नवनवीन संकल्पना राबवत आहोत. : सौरव रक्षित, व्यवस्थापक, महिंद्रा लॉजिस्टिक्स

फ्लाय अ‍ॅशप्रमाणे स्लॅगही निरुपयोगी

- Advertisement -

सिमेंट तयार करताना पर्यावरणाला घातक घटक बाहेर पडतात, मात्र स्लॅग हा मुळातच स्टिल उत्पादनातून निर्माण होणारा उपघटक आहे. ज्याप्रमाणे राखेच्या विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्याचप्रमाणे स्टील उत्पादन करणार्‍या उद्योगांसमोरही स्लॅगचे आव्हान आहे. स्टील निर्मिती करताना स्लॅग अर्थात राखेसारखा पदार्थ बाहेर पडत असतो. त्यामुळेच पर्यावरणदृष्ठ्यादेखील या स्लॅगच्या विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र, या प्रयोगामुळे स्लॅगचा प्रश्न संपुष्टात येतानाच सिमेंटमुळे वाढलेल्या घरांच्या किंमतीदेखील भविष्यात मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. स्लॅग व सिमेंटचे गुणधर्म सारखेच आहेत. स्लॅगमध्ये काही प्रमाणात अ‍ॅक्टिवेटर्स टाकून मिश्रण तयार केले जाते. हे मिश्रण सिमेंटपेक्षाही अधिक प्रभावी असल्याचे सिद्द झाले आहे.

२०१३ पासून दरवर्षी वेगळी संकल्पना राबवून नाविन्यपूर्ण प्रकल्प उभे करत आहोत. बांधकाम क्षेत्रात हा एक क्रांतिकारी प्रयोग ठरेल यात शंका नाही. : शशिकांत जाधव, संचालक, जे. के. वेअर हाऊस

..तर घरंही होतील स्वस्त

स्लॅगची एक गोणी २०० रुपयांना तर, सिमेंटची गोणी ४०० रुपयांपर्यंत मिळते. म्हणजेच बांधकामात सिमेंटसाठी होणारा ५० टक्के खर्च वाचू शकतो. परिणामी घरांच्या किंमतीही सामान्यांच्या आवाक्यात येऊ शकतील. याशिवाय केंद्र व राज्य सरकारकडून सुरू असलेल्या पूल, रस्ते अशा सार्वजनिक प्रकल्पांत स्लॅग वापरल्यास हजारो कोटी रुपये वाचू शकतील. विशेष म्हणजे स्लॅगचा रंगही सिमेंटसारखाच आहे.

- Advertisment -