घरमहाराष्ट्रमराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झगडणारा नेता, विनायक मेटेंबद्दल उद्धव ठाकरेंच्या भावना

मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झगडणारा नेता, विनायक मेटेंबद्दल उद्धव ठाकरेंच्या भावना

Subscribe

मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे माजी आमदार विनायक मेटे यांचे आज पहाटे मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील भीषण अपघातात निधन झाले. त्याबद्दल विविध राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झगडणारा नेता गमावला आहे, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठा समन्वय समितीची मुंबईत बैठक होती. त्या बैठकीसाठी ते बीडहून येत असताना खालापूर टोलनाका येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला. अचानक ट्रक मधे आल्याने वेगात असलेल्या गाडीवर नियंत्रण ठेवणे मेटे यांच्या चालकाला शक्य झाले नाही. परिणामी त्यांची गाडी ट्रकच्या उजव्या बाजूला धडकली. झोपेत असलेल्या मेटे यांच्या डोक्याला मार बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

मराठा समाजातील बांधवाना भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी सतत झगडणारे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अकाली अपघाती झालेले निधन मनाला वेदना देणारे आहे, ईश्वर त्यांच्या कुटुंबीयास या दुःखद प्रसंगी मनाला धीर देण्यास बळ देवो, अशा शोकभावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

विनायकर मेटे यांना गेली अनेक वर्ष जवळून पाहण्याचा योग आला. त्यांचा संघर्ष त्यांच्या समाजासाठी तर असायचाच; पण त्याचसोबत तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची त्यांची भूमिका असायची. भाजपसोबत असताना गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर त्यांची सतत भेट व्हायची, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले की, आपला संघर्ष हा मराठा समाजाला एक दिवस न्याय मिळवून देईल याबाबत त्यांना खात्री होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून नेहमी त्यांच्याशी संवाद होत असे. त्यांची तळमळ आणि शोषितांना न्याय देण्याचा आग्रह, धडपड पाहताना नेहमी त्यांचे कौतुक वाटायचे.

- Advertisement -

अधिवेशन काळात विधिमंडळाच्या आवारात होणाऱ्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकांमध्ये त्यांचा आग्रह कायम विधान परिषदेत मराठा आरक्षणाबाबत विशेष चर्चा घेण्याचा असे. त्यांच्या अशा अकाली निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -