घरमहाराष्ट्रसोमय्यांवरील कारवाईबाबत महाविकास आघाडीत बेबनाव

सोमय्यांवरील कारवाईबाबत महाविकास आघाडीत बेबनाव

Subscribe

पोलिसांच्या कारवाईमुळे किरीट सोमय्या हे अचानक प्रकाशझोतात,

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात जाण्यापासून रोखण्यासाठी करण्यात आलेल्या पोलीस कारवाईवरून महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांमधील बेबनाव उघडकीस आला आहे. सोमय्यांवरील कारवाईत मुख्यमंत्री कार्यालयाचा कोणताही संबंध नाही, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मात्र त्यावर सावध प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांना कारवाईबाबत काही माहिती आहे की नाही हे मी सांगू शकत नाही, असे म्हटले आहे. मात्र, पोलिसांच्या कारवाईमुळे किरीट सोमय्या हे एकदम प्रकाशझोतात आले असून सोमवारी सकाळी मुंबईत परतताच त्यांचे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.

किरीट सोमय्या यांच्याविरोधात रविवारी आघाडी सरकारकडून पोलीस कारवाई करण्यात आली. त्यांनी कोल्हापुरात जाऊ नये म्हणून त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला. तरीही ते कराडपर्यंत गेले. तेथे त्यांना अडवण्यात आले. या संपूर्ण घटनेबाबत दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नॉर्मली अशी घटना घडते तेव्हा वरिष्ठ अधिकारी गृहमंत्र्यांना ब्रिफिंग करतात आणि मुख्यमंत्र्यांनाही ब्रिफिंग करत असतात. मात्र, या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना ब्रिफिंग केले की नाही हे मला माहिती नाही, असे सांगतानाच कालच्या घटनेशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही. कारवाईचा जो काही निर्णय आहे, तो गृहमंत्रालयाने घेतला आहे ही वस्तुस्थिती आहे, असे वळसे-पाटील म्हणाले.

- Advertisement -

सोमय्यांचे जल्लोषात स्वागत

कराडमधून परतल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांचे त्यांच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच मुलुंडमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. ‘किरीटजी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. कार्यकर्त्यांनी दिलेल्या ऊर्जेनंतर किरीट सोमय्या देखील चार्ज झाले. त्यांनी पुन्हा सकाळचाच पाढा वाचत ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली आणि यावेळी मात्र शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे मोर्चा वळवत त्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला. मुंबईत पाऊल ठेवताच पुन्हा त्याच आवेशाने त्यांनी ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांविरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या.

पारनेर कारखान्याचीही चौकशी – सोमय्या

मी पारनेर साखर कारखाना बचाव समितीच्या सोबत पारनेर साखर कारखान्यास भेट देणार आहे. ३२ कोटी रुपयांमध्ये कशा पद्धतीने कारखाना पवार परिवाराच्या प्रभावाखाली दिला गेला. पवार परिवाराचे घनिष्ठ उद्योगपती मित्र यांनी त्यामध्ये २३ कोटी रुपये कसे टाकले? या सगळ्यांचे पुरावे माझ्या हातात आलेले आहेत. ईडीसोबत माझी चर्चा सुरू आहे. परवा मी पारनेर साखर कारखान्याची पाहणी केल्यानंतर ईडी सोबत चर्चा करणार आहे. पारनेर साखर कारखान्याची आयकर विभाग, सहकार मंत्रालय आणि ईडी कडून चौकशी सुरू आहे. जरंडेश्वर नंतर पवार परिवाराशी संबंधित पारनेर साखर कारखान्याचा घोटाळ्याबाबत येत्या काही आठवड्यात कारवाई सुरू होणार. अशी माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

- Advertisement -

हसन मुश्रीफ यांच्या संबंधात मी एवढेच सांगणार, की ठाकरे सरकारच्या राज्यात मंत्री झाल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने गडहिंग्लज साखर कारखाना काबीज केला. कोणत्याही प्रकारची लिलाव प्रक्रिया नाही. थेट मंत्रालयातून हसन मुश्रिफांच्या बेनामी कंपनीला कारखाना दिला गेला आणि त्यात पैशांची हेराफेरी हे उद्धव ठाकरेंच्या राज्यात झालेले आहे. मी पुढच्या आठवड्यात हसन मुश्रीफ यांनी स्वतःच्या मंत्रालयाचं कॉन्ट्रॅक्ट स्वतःच्या बेनामी कंपनीला कशा पद्धतीने दिले, याचे देखील कागदपत्रे जनतेसमोर मांडणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -