घरमहाराष्ट्रशिंदे-फडणवीस सरकारला नाराजीचे ग्रहण; एका मंत्र्यासह तीन आमदारांमध्ये धुसफूस

शिंदे-फडणवीस सरकारला नाराजीचे ग्रहण; एका मंत्र्यासह तीन आमदारांमध्ये धुसफूस

Subscribe

मुंबई – विविध कारणांमुळेविरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एकाच पक्षात फूट पडून दोन नेते एकमेकांवर नाराज होत असल्याचं समोर येत आहे. फक्त पक्षातीलच नव्हे तर सत्तेसाठी एकत्र आलेल्या युतीतही नाराजी निर्माण होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद ताजा असतानाच राज्यातील विविध पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतील ४० आमदारांनी त्यांना साथ दिली. तसंच, अनेक अपक्ष आमदारही त्यांच्यासोबत होते. यामध्ये अपक्ष आमदार बच्चू कडू यांचाही समावेश आहे. बच्चू कडू यांनी ५० खोके घेऊन शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचा आरोप अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला. रवी राणा यांच्या आरोपावरून बच्चू कडू संतापले आहेत. रवी राणा भाजपाचे समर्थक आहेत. तर, बच्चू कडूंनी शिंदेंना पाठिंबा दिल्याने तेही युतीचे समर्थक आहेत. त्यामुळे युतीतील दोन नेते एकमेकांवर नाराज असून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. रवी राणा यांनी आरोप सिद्ध करावा अन्यथा १ नोव्हेंबर रोजी बच्चू कडू त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहेत. एवढंच नव्हे तर, बच्चू कडू यांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. युतीतील दोन नेते एकमेकांसमोर आल्याने आता युतीच्या अन्य नेत्यांनी त्यांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा …नाहीतर घरी येऊन भांडी घासेन, बच्चू कडू यांनी रवी राणा यांना दिलं खुलं आव्हान

एकीकडे रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात वाद सुरू असताना दुसरीकडे शिंदे गटातील धुसफूसही बाहेर पडत आहे. आमदार चिमणराव पाटील आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात जुगलबंदी रंगली आहे. चिमणराव पाटील हे पारोळा एरंडोल मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याच्या मुलाला पाणीपुरवठा योजनेचे काम दिले. तसेच या कामाचे उद्घाटनही केले. यावेळी गुलाबराव पाटील यांचा मुलगाही उपस्थित होता. चिमणरावांचा हा मतदारसंघ असून त्यांना साधं निमंत्रणही देण्यात आलेलं नाही. यावरून चिमणराव पाटील आणि गुलाबराव पाटील यांच्यात वाद सुरू आहे. एकाच जिल्ह्याचे आणि एकाच संघटनेचे दोन लोकप्रतिनिधी एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली आहे. मुख्यमंत्र्यांनी फोन करून सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, यांच्यातील शाब्दिक युद्ध दिवसेंदिवस वाढत जाताना दिसतंय.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातच वादाची ठिणगी पडली होती. ओवळा माजिवाडा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात सध्या प्रताप सरनाईक आमदार आहेत. परंतु, ही जागा येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाला द्यावी, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी प्रताप सरनाईक यांना केली आहे. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रताप सरनाईक यांच्यासोबत वाद झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंतु, या दोघांमध्ये वाद नसून सारंकाही आलबेल आहे, असं प्रताप सरनाईक यांचा पूत्र पूर्वेश सरनाईक याने दिली.

हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदे, प्रताप सरनाईकांच्या वादावर पूर्वेश सरनाईक ट्वीट करत म्हणाले… ‘दो दिल’ 

एकनाथ शिंदे यांचा मंत्रिमंडळ विस्तारही रखडला आहे. पहिल्या टप्प्यात अनेक आमदार नाराज झाले होते. त्यांना दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं आहे. मात्र, यावरूनही वाद सुरू झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात आपली वर्णी लागावी याकरता संजय शिरसाट यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -