घरमहाराष्ट्रहिंदकेसरी स्पर्धेचा चालक कोण? मालक कोण?

हिंदकेसरी स्पर्धेचा चालक कोण? मालक कोण?

Subscribe

पुण्यातील हिंदकेसरी किताब स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच दिल्लीतील मूळ संघटनेने ती गायब केली. प्रत्यक्षात मातीवरील पहिली राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा खेळवण्यात आली. या गदारोळात हिंदकेसरी हा किताब असणार्‍या स्पर्धेचा खरा मालक कोण, हा प्रश्न क्रीडाशौकिनांच्या मनी अनुत्तरीतच राहिला आहे.

जालन्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा डंका वाजत असतानाच पुण्यात हिंदकेसरी स्पर्धेची धामधूम सुरू झाली होती. गत वर्षाच्या अखेरीस जालनात लाकुड तोडणार्‍या बाला रफिक शेखने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. पुण्यातील हिंदकेसरी किताब स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच दिल्लीतील मूळ संघटनेने ती गायब केली. पुण्यात हिंदकेसरी होणार असा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. प्रत्यक्षात मातीवरील पहिली राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा खेळवण्यात आली. या गदारोळात हिंदकेसरी हा किताब असणार्‍या स्पर्धेचा खरा मालक कोण, हा प्रश्न क्रीडाशौकिनांच्या मनी अनुत्तरीतच राहिला आहे. नव्या वर्षात हिंदकेसरी स्पर्धेचे खरे संयोजक कोण, हे आता न्यायालयच ठरविणार आहे.

महाराष्ट्र केसरीनंतर कुस्तीगिरांना हिंदकेसरी स्पर्धेचे वेध लागतात. गतवर्षी प्रथमच या स्पर्धा आठवड्याभरात होणार म्हणून कुस्तीशौकिनांमध्ये उत्साह होता. जालन्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा रंगात आली असतानाच पुण्यात हिंदकेसरी स्पर्धेची जय्यत तयारी होत आहे, असे घोषित करण्यात आले होते. कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी – चिंचवडचे नगरसेवक मयुर कलाटे आणि सचिन घुटुकुले यांनी संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रथमच या स्पर्धेला भारतीय कुस्ती महासंघाने मान्यता दिली होती. येथेच वादाची ठिणगी पेटली. मुळात गेली पाच दशके हिंदकेसरी तसेच मातीवरील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा भारतीय शैली कुस्ती महासंघ आयोजित करीत आहे. श्रीपती खंजनाळे, गणपत आंदळकरपासून ते विनोद चौगुले, अमोल बराटे यांच्यापर्यंत जे मराठमोळे हिंदकेसरी झाले ते याच संघटनेकडून खेळले होते. भारतीय शैली कुस्ती महासंघाकडे हिंदकेसरी स्पर्धेचे हक्क असताना भाजपाने खासदार ब्रिजभूषण शरण सिंह उर्फ नेताजी यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्यावतीने हिंदकेसरी स्पर्धेचा घाट पुण्यात घातला. याच काळात भारतीय शैली कुस्ती महासंघाचे सर्वेसर्वा रोशनलाल यांनी हिंदकेसरी स्पर्धा कुस्तीपंढरी कोल्हापुरात होणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे हिंदकेसरी स्पर्धा नेमकी कोणाची, भारतीय शैली कुस्ती महासंघाची की मॅटवर कार्यरत असणाऱ्या भारतीय कुस्ती महासंघाचे, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. त्यात महाराष्ट्र केसरी किताबाची मानकरी ठरलेले बाला रफिक शेख आणि अभिजित कटके यांनी या स्पर्धेतून माघार घेतल्याने मैदानात उतरण्यापूर्वीच महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात आले होते.

- Advertisement -

रोशनलाल यांच्या संघटनेचा हिंदकेसरी किताब रातोरात खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी पळवला खरा. पण, न्यायालयाने त्यांना हिंदकेसरी या नावाशिवाय स्पर्धा घेण्याचा निर्णय दिला. यामुळे पुण्यातील स्पर्धा ही मातीवरील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धाच ठरली. देखणी अशी ही स्पर्धा राष्ट्रवादीच्या युवकांनी भरवली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार स्वतः दोन्ही दिवस या स्पर्धेला भरपूर वेळ काढून हजर होते. त्यांची कन्या सुप्रिया सुळे यादेखील आल्या होत्या. पुढील वर्षी ही स्पर्धा बारामतीत घेतली जाईल, असेही खासदार सुळे यांनी घोषित केले.

पुण्याच्या स्पर्धेत हरियाणाच्या विशालकुमारने सेनादलाच्या राजन तोमर सालतु डावाची तोड करत हप्ते डावावर चितपट विजय मिळवत पहिल्या पारंपरिक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील १२५ किलो वजनी गटातील किताबाचा मान मिळवला. राष्ट्रीय स्पर्धेला साजेसे नियोजन होत असताना या स्पर्धेवर पूर्णपणे छाप होती ती नेताजी ब्रिजभूषण शरण सिंह यांचीच. स्पर्धेवर सारे नियंत्रण हे उत्तर महाराष्ट्रातील पंचांचेच होते. स्पर्धेचे दोन्ही दिवस स्वतः ब्रिजभूषण शरण सिंह हे हातात माईक घेऊन उभे होते. अनेकांच्या मनात प्रश्न हा आला की, एवढा मोठा खासदार माणूस, उत्तर प्रदेशातील बडी असामी मात्र पुण्यातील स्पर्धेवर का इतके लक्ष घालत आहे. स्पर्धा पवारांच्या वाढदिवसीच का, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेली की ब्रिजभूषण शरण सिंह यांनी, हे शेवटपर्यंत समजून आले नाही.

- Advertisement -

ब्रिजभूषण शरण सिंह हे थांबणार नाहीत. ते यंदासारखेच पुढच्या वर्षीही पवारांच्या बालेकिल्यात येऊन मातीवरील स्पर्धा भरवतीलही. पण, सवाल हा आहे की, हिंदकेसरी किताब स्पर्धेचे चालक, मालक कोण, रोशनलाल की ब्रिजभूषण शरण सिंह. तुर्त रोशनलाल यांनी लढाई जिंकली असली तरी त्यांची कोल्हापुरात होणारी हिंदकेसरी स्पर्धाही अडचणीत आली आहे. कारण आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही दोन्ही संघटनांना सलंग्न आहे. पुण्यात झालेल्या स्पर्धेत केवळ फ्लेक्सवर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद दिसली. प्रत्यक्षात सर्व कारभार केला तो भारतीय कुस्ती महासंघानेच. आता खरी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पेचात सापडली आहे. रोशनलाल यांच्या कोल्हापुरातील स्पर्धेला मान्यता दिली तर ब्रिजभूषण शरण सिंह नाराज होतील. नव्हे ते आणि दस्तुरखुद्द शरद पवारही कुस्तीगीर परिषद कामकाजावर नाराज झाले आहेत. यामुळे कोल्हापुरात हिंदकेसरी स्पर्धा होण्याची शक्यता मावळली आहे. असाच रडीचा डाव महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने कुस्ती लीग स्पर्धेत खेळला होता. यामुळे कलर्स वाहिनीची ही लीग वादात सापडली.

हिंदकेसरी स्पर्धा संयोजनात मोठी आर्थिक गणिते आहेत. तशीच हिंदकेसरी किताब जिंकण्यासाठीच अर्थनिती खेळत असते. यामुळे गेल्या अनेक वर्षांत हिंदकेसरी किताब विजेत्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला आहे. मातीवरील पारंपरिक विद्या मल्ल जोपासत असताना आपण मॅटवरील कुस्तीतही सुशीलकुमार, योगेश्वर दत्त, साक्षी मलिक सारखे ऑलिम्पिक विजेते घडवण्यात मागे पडणार नाही याचे भान ब्रिजभूषण शरण सिंह, शरद पवार यांनी राखावे हीच नववर्षी देशातील कुस्तीशौकिनांची अपेक्षा आहे.


– संजय दुधाणे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -