Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महाविकास आघाडीत संभ्रम कायम

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महाविकास आघाडीत संभ्रम कायम

चर्चेअंती आघाडीचा निर्णय होणार; काँग्रेस निवड मंडळाच्या बैठकीत चर्चा

Related Story

- Advertisement -

आगामी महापालिका, नगरपालिका निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करून लढवायची किंवा कसे याबाबत स्थानिक पातळीवर चर्चा करूनच निर्णय घेण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील आघाडीचा संभ्रम अजून कायम आहे. कोरोनाची साथ नियंत्रणात आली तर नजीकच्या काळात कोल्हापूरसह नवी मुंबई, औरंगाबाद, वसई- विरार, कल्याण- डोंबिवली महापालिकेची निवडणूक होणार आहे. ज्या महापालिका क्षेत्रात ज्या पक्षाची ताकद जास्त त्या पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचे महाराष्ट्र विकास आघाडीचे सूत्र आहे.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रदेश काँग्रेसच्या निवड मंडळाची बैठक झाली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत चर्चा झाली. या निवडणुका आघाडी करून लढायच्या किंवा कसे? याबाबत स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले. आजच्या बैठकीत केंद्रातील काळे कृषी कायदे, कामगार कायदे आणि वाढती इंधनदरवाढ यासह राजकीय विषयांवर चर्चा झाली. संघटना आणि सरकारच्या कामकाजाबाबत या बैठकीत विचारविमर्श करण्यात आला. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असून एक दिवस शेतक-यांसोबत हा कार्यक्रम राबवण्याबाबतही चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी संकल्प अभियान राबविले जाणार आहे, त्यासाठी सहा महिन्यांचा कार्यक्रम देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली.

- Advertisement -

बैठकीत केंद्राचे शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे त्वरीत रद्द करावेत. केंद्राचे हे कायदे महाराष्ट्रात लागू करू नये परंतु शेतकऱ्यांसाठी नवीन आवश्यक कायदा करावा. वैधानिक मंडळे त्वरीत स्थापन करून त्यानुसार निधीचे वितरण व्हावे. इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे. राज्यातील आदिवासी, मागासवर्गीय समाज, ओबीसी, भटक्या जाती, अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी. या तरतूद व्यपगत होऊ नये म्हणून कायदा करण्यात यावा, असे ठराव करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे मंत्री उपस्थित होते.

भाजपला धोबीपछाड देऊ – पटोले

- Advertisement -

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीने भाजपकडून सत्ता खेचून आणली. सांगलीप्रमाणे राज्यातील इतर महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदांमध्येही भाजपला असाच धोबीपछाड देऊ, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी सांगितले. सांगली महापालिकेत झालेले सत्तांतर हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय आहे. भाजपच्या एककल्ली कारभाराला जनता कंटाळली असून विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दणदणीत विजयी मिळवला होता. राज्यातील सरकारच्या विकास कामांवर लोकांचा विश्वास वाढला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी होतील असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने भाजपला सत्तेवरून खाली खेचल्याबद्दल पटोले यांनी अभिनंदन केले आहे.


हेही वाचा – आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटींची वाढ


 

- Advertisement -