महाराष्ट्रात २०२४ मध्ये काँग्रेस एक नंबरचा पक्ष असेल – नाना पटोले

Congress leader to meet governor on inflation, fuel price hike, cycle rally from hanging garden
महागाई, इंधनदरवाढीच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते राज्यपालांना भेटणार, हँगिंग गार्डनपासून सायकल रॅली

महाराष्ट्रात २०२४ मध्ये काँग्रेस एक नंबरचा पक्ष असेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. नाना पटोले गेले काही दिवस महाराष्ट्राचा दौरा करत असताना कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. दरम्यान, कार्यकर्त्यांशी संवाद साधाताना नाना पटोले यांनी काही वक्तव्य केली आहेत. या वक्तव्यांमुळेच नाना चर्चेत आहेत. यावरुन आज शिवसेनेने ‘सामना’तून नानांच्या वक्तव्यांमुळे काँग्रेसच्या किती कार्यकर्त्यांमध्ये उर्जा निर्माण झाली असा सवाल उपस्थित केला. यावर उत्तर देताना नाना पटोलेंनी हा दावा केला आहे.

नाना पटोले यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी “महाराष्ट्र हे काँग्रेसचं राज्य आहे. तुम्हाला त्याचा निकाल भविष्यात पहायला मिळणार. आम्ही जी दिशा घेऊन काम करतोय, त्यानुसार महाराष्ट्रात काँग्रेस एक नंबरचा पक्ष असेल हे २०२४ मध्ये आपल्याला पहायला मिळेल,” असं म्हटलं.

स्वबळाच्या निर्णयावर पक्षात चर्चा करु 

“स्वबळाचा निर्णय हा पक्षाच्या बैठकीत घेतला जाईल. शरद पवार यांनी काल जे वक्तव्य केलं आहे, २०१४ मध्ये पण त्यांनी असाच निर्णय घेतला होता. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय होता. निवडणुका कशा लढायच्या ही आमच्या पक्षाची रनणीती आहे,” असं नाना पटोले म्हणाले.

नानांच्या बोलण्यावर सरकारचे भवितव्य अवलंबून नाही – शिवसेना

“नाना काय काय बोलतात व कसे डोलतात यावर महाराष्ट्र सरकारचे भवितव्य अजिबात अवलंबून नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार व सोनिया गांधींच्या मर्जीने हे सरकार चालले आहे. नानांवर पाळत ठेवली जात आहे, असे त्यांना वाटते. कालच्या विधिमंडळ अधिवेशनात नानांनी ‘पाळत’ ठेवण्याचा मुद्दा जोरकसपणे मांडला. फडणवीस सरकारच्या काळात अनेकांवर पाळत ठेवण्यात आली. महत्त्वाच्या नेत्यांचे फोन ‘टॅप’ करण्यात आले. त्यात नानाही होते. आता या प्रकरणाची चौकशी लागली आहे. सरकार एखाद्याचे फोन ‘टॅप’ करीत असेल म्हणजे एक तर तो देशविघातक कारवायांत सहभागी असायला हवा, नाही तर त्या व्यक्तीपासून सरकारला धोका आहे, असे समजायला हवे. नाना दुसऱया प्रकारात मोडतात. नानांमुळे सरकार पडेल किंवा नवे सरकार येईल, असे पोलीस खात्यातील फडणवीसांच्या अंधभक्तांना तेव्हा वाटले असेल. त्यातून नानांचे फोन चोरून ऐकण्यात आले,” असा दावा शिवसेनेने केला आहे.