काँग्रेसकडून राज्यसभेसाठी इमरान प्रतापगढि उमेदवार, मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून संधी

Congress announces candidate for Rajya Sabha gives opportunity to Mukul Wasnik from Sajasthan
काँग्रेसकडून राज्यसभेसाठी इमरान प्रतापगढि उमेदवार, मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून संधी

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून उमेदवारी दिली आहे. राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांवर निवडणूक घेण्यात येत आहे. अर्ज भरण्याची मुदत संपत आली असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. येत्या १० जूनला राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढि यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

राष्ट्रीय काँग्रेसकडून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर छत्तीसगडमधून राजीव शुक्ला आणि रनजीत रंजन, हरयाणातून अजय मकेन, कर्नाटका जयराम रमेश, मध्यप्रदेश विवेक तंखा, राजस्थानमधून तीन सदस्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी तर तामिळनाडू येथून पी. चिंदंबरम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पी. चिदंबरम यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती.

राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात शिवसेना आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यातील संघर्ष ताजा असताना आता राज्यसभेच्याच निवणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्येही अंतर्गत धुसफूस उफाळून येत असल्याचे दिसते. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून राज्याबाहेरील व्यक्तीला संधी दिली जाणार असल्याची शक्यता असून राज्यातील काँग्रेस नेत्यांनी मात्र हायकमांडच्या निर्णयावर जाहीरपणे नाराजी व्यक्त करायला सुरूवात केली आहे.

प्रदेश काँग्रेसमधील नेते नाराज झाले

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढि यांना उमेदवारी दिली आहे. राज्याच्या बाहेरचा उमेदवार लादल्याने प्रदेश काँग्रेसमधील नेते नाराज झाले आहेत.

राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी येत्या १० जून रोजी निवडणूक होत आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार  काँग्रेसचा एक उमेदवार निवडून जाणार आहे. या एका जागेसाठी राज्यातील अनेक नेते इच्छुक होते. यावेळी बाहेरचा उमेदवार नको, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, काँग्रेस हायकामंडने पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचे इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या सहीने रविवारी रात्री काँग्रेसच्या राज्यसभा उमेफवारांची यादी घोषित करण्यात आली. राज्यसभेचे मावळते सदस्य आणि गेल्यावेळी महाराष्ट्रातून निवडून गेलेले पी. चिदंबरम यांना यावेळी तमिळनाडू येथून तर मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर इमरान प्रतापगढी यांना पाठविण्यासाठी काँग्रेस हायकमांड उत्सुक असल्याचे समजते. इमरान प्रतापगढी हे काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आहेत. अल्पसंख्याकाला महाराष्ट्रामधून राज्यसभा उमेदवारी देण्यासाठी प्रियंका गांधी आग्रही असल्याचे समजते. अशावेळी राज्यातील अनेक नेते इच्छुक असताना राज्याबाहेरील नेत्याला संधी मिळणार असल्याने महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नाराज असल्याचे समोर आले आहे.

राज्यातील उमेदवार दिल्यास विरोध करण्याचा प्रश्नच उदभवत नाही, मात्र अशाप्रकारे इतर राज्यातील उमेदवार दिला गेल्यास याचा निषेध म्हणून विरोधात मतदान करण्याबाबत महाराष्ट्र काँग्रेसमधील नेतेमंडळी खासगीत चर्चा करीत आहेत. राज्यसभा निवडणुकीत  काँग्रेस हमखास एक जागा जिंकू शकते. त्यामुळे हा उमेदवार राज्यातीलच असावा असा महाराष्ट्र काँग्रेसमधील नेतेमंडळीचा आग्रह असल्याचे समजते.