मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता राज्यात राजकीय वर्तुळात अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत. एकीकडे मतदानानंतर अनेक एक्झिट पोल समोर येत असून दुसरीकडे प्रमुख नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदाना पार पडल्यानंतर आता गुरुवारी (21 नोव्हेंबर) महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, “288 जागांचा आढावा घेतल्यानंतर महाविकास आघाडीचेच सरकार येणार, हे निश्चित आहे,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Congress Balasaheb Thorat on Exit Polls and MVA will won)
हेही वाचा : Maharashtra Exit Poll : एक्झिट पोलच्या बरोबर…काय म्हणाले शरद पवार गटाचे प्रवक्ते?
पत्रकारांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “महाविकास आघाडीचे सरकार अगदी सहजपणे येणार आहे. यामध्ये आम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. 288 जागांचा आढावा आम्ही घेतल्यानंतर हे चित्र स्पष्ट दिसत आहे.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांना सत्तेसाठी कोणती जुळवाजुळव करावी लागेल का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आम्हाला जुळवाजुळव करायची वेळ येणार नाही, आमच्याबरोबर आले तर आम्हाला आनंदच होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महायुतीचे सरकार घालवणे आमचे प्राधान्य
बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, “आता निवडणूक झाली, उद्या निकाल येईल. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही ही चर्चा करू.” असे ते म्हणाले. तसेच, महायुतीचे सरकार सत्तेवरून घालवणे याला आमचे प्राधान्य असणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. “आमचा कुणीही आमदार फुटणार नाही. ती काळजी आम्हाला नाही. आमचा चांगला आकडा बनतोय. आम्ही सरकार स्थापनेचा दावा करणार आणि सरकार बनवणार आहे,” असे ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.