घरमहाराष्ट्रकाँग्रेसची स्वबळाची भाषा सुरूच

काँग्रेसची स्वबळाची भाषा सुरूच

Subscribe

महाविकास आघाडीत स्वबळावरून बेबनाव

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या भाषेला पक्ष प्रभारी एच.के.पाटील यांनी रोख दिली असतानाच तीच मागणी घेऊन मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी आम्हाला स्वतंत्रपणे लढू द्या, अशी मागणी केल्याने महाविकास आघाडीत सारे काही अलबेल नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. स्वबळाची ही शब्दफेक माजी मंत्री सुनील देशमुख यांच्या पक्ष प्रवेशावेळी झाल्याने तोच एक चर्चेचा विषय काँग्रेस पक्षात सुरू आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा, लोकसभा यासह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकस्वबळावर लढवण्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. पटोले यांच्या या घोषणेनंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्वबळाच्या भाषेवर टीका केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर स्वबळाच्या भाषेचा निर्णय आघाडीतील घटक पक्षांचे तीन नेते घेतील, असे सांगत काँग्रेस पक्षाला चपराक दिली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी पार पडलेल्या माजी मंत्री सुनील देशमुख यांच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील यांनी असा स्वबळाने निवडणुका लढण्याचा कुठलाही निर्णय पक्षाने घेतला नसल्याचे सांगत प्रदेश काँग्रेसमधील चर्चेला विराम दिला होता.

- Advertisement -

मात्र असे असूनही मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पुन्हा स्वबळाची भाषा करत महाविकास आघाडीत सारे काही अलबेल नाही, असे सांगून टाकले आहे. कोणामध्ये किती हिंमत आहे ते पाहूया, असेही भाई जगताप यांनी म्हटले. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी २०२४ मध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी झटले पाहिजे, असे सांगत स्वबळाच्या चर्चेत जान आणण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसला तिसरा पक्ष म्हटले जात आहे. कोरोना काळात काँग्रेसने केलेले काम तुम्ही पाहिले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकींमध्ये काँग्रेसला लढू द्या, मग बघूया कोणामध्ये किती ताकद आहे, असे भाई जगताप यांनी म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -