भाजपाच्या विरोधामुळे काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार मातोश्रीवर ?

काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सत्तार शिवसेनेत प्रवेश करणार की काय अशी चर्चा रंगू लागली. मात्र याबाबत अब्दुल सत्तार यांना विचारले असता सिल्लोडचा मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार की भाजपाकडे जाणार हे अजून ठरले नसून, मी आता वाट बघत आहे आणि जर काहीच निर्णय झाला नाही तर मी अपक्ष लढेन अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.

अन्यथा अपक्ष लढेन..

शिवसेना आणि भाजप पक्षाचे दरवाजे माझ्यासाठी उघडे आहेत त्यामुळे मी या दोघांपैकी कोणत्यातरी एका पक्षात जाणार हे नक्की असून, आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. मात्र सिल्लोड मतदारसंघ शिवसेनेला जातो की भाजपाला जातो हे अजून ठरलेले नसून, सध्या मी काही निर्णय घेतला नाही. तसेच जो पर्यत जागा कुणाला सुटणार हा निर्णय होत नाही तोवर मी निर्णय घेणार नाही असे सत्तार यांनी सांगितले. तसेच विखे पाटील यांचा शिर्डीचा मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे पण आता तो भाजपाकडे जाईल त्यामुळे ह्या मतदारसंघाच्या तडजोडी होऊन मला दोन्ही पक्षांपैकी एका कडून तिकीट मिळणार आहे आणि नाही मिळाले तर मी अपक्ष लढेन असे सत्तार यांनी सांगितले.

भाजपाच्या विरोधामुळे सत्तार मातोश्रीवर?

दरम्यान आमदार अब्दुल सत्तार यांच्या भाजपा प्रवेशाला सिल्लोडसोयगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे सत्तार यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सिल्लोड नुकत्याच झालेल्या बैठकीत आमदार सत्तार यांना भाजपात प्रवेश देऊ नये अशी मागणी करण्यात आली।होती.