नाशिक : लोकसभा निवडणुकांची तारीख अजून जाहीर झाली नाही मात्र त्यासाठी आतापासूनच सर्व पक्षांची जययत तयारी सुरू केली आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडी आहे. मात्र नाशिकमधील ठाकरे गटाच्या लोकसभेच्या जागेवर काँग्रेसनेही दावा ठोकला असून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिकचे निरीक्षक माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी आगामी निवडणूक नाशिक जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचे मत व्यक्त केल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काय निर्णय घेणार हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
काँग्रेस भवन येथे नुकतीच पदाधिकार्यांची बैठक संपन्न झाली. जिल्ह्याचे निरीक्षक डॉक्टर उल्हास पाटील यांनी काँग्रेस पक्ष दोन्ही लोकसभा लढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नाशिकमधील दिंडोरी येथील लोकसभेची एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. तर दुसरी एक जागा ठाकरे गटाकडे आहे. या जागेवर ठाकरे गटाकडूनही आपला हक्क बजावला जाऊ शकतो. मात्र तरीही काँग्रेसने लोकसभेची मागणी केल्याने आता नाशिकची जागा नेमकी कुणाला जाणार आहे आता येणारा काळच ठरवणार आहे. आगामी काळात बूथ पासून ब्लॉक पर्यंत तसेच तालुकास्तरावर ग्रामीण भागात शहरात कार्यकर्त्यांची मजबूत उभी करून येणार्या काळात लोकसभेच्या दोन्ही जागा काँग्रेस पक्ष निवडून येईल असा विश्वास डॉक्टर पाटील यांनी बैठकीत व्यक्त केला. जिल्ह्याचे प्रभारी डॉक्टर राजू वाघमारे यांनी लवकरच नाशिक जिल्ह्याचा तालुका, तालुकास्तरावर दौरा करणार असल्याची माहिती दिली.
काँग्रेसचा विचार राहुल गांधींचा विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता प्रत्येक काँग्रेस पदाधिकार्यांवर आहे. आगामी काळामध्ये शहर व जिल्ह्यात बस यात्रा तसेच पदयात्रा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याची माहिती सहप्रभारी ब्रिजकिशोर दत्त यानी दिली. बैठकीची प्रास्ताविक नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी केले. यावेळेस शहर काँग्रेसच्या कामकाजाचा आढावा आकाश छाजेड यांनी दिला बैठकीला आमदार हिरामण खोसकर, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, संपत सकाळे, प्रदेश सचिव राहुल दिवे, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, नंदकुमार कर्डक, संदीप गुळवे, यांनी आपले विचार मांडले.