घरमहाराष्ट्रमला मुख्यमंत्री होण्याची अजिबात घाई नाही - अशोक चव्हाण

मला मुख्यमंत्री होण्याची अजिबात घाई नाही – अशोक चव्हाण

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं काम उत्तम सुरु आहे. मला आघाडीत बिघाडी करायची नाही. त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची कोणतीही घाई नाही, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे. राज्यात सध्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छांची जोरदार चर्चा सुरु आहे. जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमचा पाठिंबा असल्याचं म्हटलं. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील मिश्किलपणे जयंत पाटलांच्या इच्छेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. यामुळे राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीची जोरदार चर्चा सुरु होती.

अशोक चव्हाण भोकरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमात मला मुख्यमंत्री होण्याची अजिबात घाई नाही, असं वक्तव्य केलं. “महाविकास आघाडीचं सरकार सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. आपली सत्ता आली म्हणून सर्व कामं होत आहेत. त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची अजिबात घाई नाही आहे. उद्धव ठाकरे राज्याच्या प्रमुख आहेत. त्यांच्या सोबत मनापासून साथ देत आहोत. त्यामुळे मला कुठेही या महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण करायची नाही आहे. काही लोक बिघाडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण चिंता करु नका, तसं काही होणार नाही. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, शरद पवार, अजित पवार आम्ही सर्व प्रमाणिकपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहू आणि महाविकास आघाडी सरकार पुढील पाच वर्ष टीकेल असा विश्वास आहे,” असं अशोक चव्हाण म्हणाले.

- Advertisement -

काय म्हणाले जयंत पाटील?

जयंत पाटील यांनी मुलाखत देताना मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु पुरेसं संख्याबळ असणं ते देखील महत्त्वाचं आहे, असं जयंत पाटील म्हणाले. “मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा आहे. प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावं असं वाटणारच. पण पक्ष जो निर्णय घेईल, शरद पवार जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम असतो. दिर्घकाळ काम करणाऱ्या सर्वांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा असते. मलाही आहे. माझ्या मतदारांनाही वाटत असावं. त्यामुळे माझी जबाबदारी माझे मतदारही आहेत. त्यामुळे इच्छा आहे. परंतु, परिस्थिती, संख्या…आमची संख्या ५४ आहे. त्यामुळे ५४ वर मुख्यमंत्री होणं मला नाही वाटत शक्य आहे. त्यासाठी पक्ष वाढला पाहिजे. संख्या वाढली पाहिजे. त्यानंतर पक्ष वाढला, संख्या वाढली तर मग शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य आहे,” असं जयंत पाटील म्हणाले.


हेही वाचा – ‘मलाही मुख्यमंत्री व्हायचंय, पण…’; जयंत पाटलांनी व्यक्त केली इच्छा

- Advertisement -

अजित पवारांचा जयंत पाटलांना पाठिंबा

अजित पवारांनी आपला जयंत पाटील यांना पाठिंबा असल्याचे म्हटलं. जयंत पाटील साहेबांनी जी इच्छा व्यक्त केली आहे, त्या इच्छेला मी पाठिंबा देतो, अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली.

शरद पवार काय म्हणाले?

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. पण ते झाले का? उद्या मलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं तर काय करू? मला कुणी करणार नाही, म्हणून मी वाटून घेत नाही, असं शरद पवार म्हणाले.


हेही वाचा –  ‘मलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं तर काय करू?’ शरद पवारांची जयंत पाटलांवर प्रतिक्रिया!


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -