‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून शाळकरी मुलांमध्ये भाजपाचा प्रचार; काँग्रेसचा गंभीर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘परिक्षा पे चर्चा’साठी शाळा व विद्यार्थी वेठीस, काँग्रेसचं टीकास्त्र

congress leader atul londhe attack pm narendra modi on pariksha pe charcha 2023

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशातील शाळकरी मुलांसाठी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
मात्र कार्यक्रमावर आता विरोधकांनी गंभीर टीका केली आहे. हा कार्यक्रम सरकारी असताना राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारीही उपस्थित होते. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या आडून भारतीय जनता पक्ष शाळकरी मुलांमध्ये पक्षाचा प्रचार करत असून हे अत्यंत गंभीर असल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या कार्यक्रमावर गंभीर आरोप केले आहेत.

अतुल लोंढे म्हणाले की, ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम देशभरातील शाळांमध्ये दाखवण्याचे निर्देश देण्यात आले होते. ग्रामीण भागात वीज व इंटरनेट सुविधेचा अभाव असतानाही मुख्याध्यापकांना हा कार्यक्रम मुलांना दाखवण्याचे सरकार फर्मानच काढले होते. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागानेही तसे निर्देश दिले होते. पंतप्रधानांचा कार्यक्रम लाईव्ह दाखवण्यासाठी शाळांना वेठीस धरण्यात आले. सरकारी कार्यक्रम असूनही भारतीय जनता पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांसोबतच सहभागी होण्याची काय गरज होती? शाळकरी मुलांमध्ये राजकीय नेत्यांची ही लूडबुड काय कामाची? पंतप्रधानांचे धडे ऐकण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता, का भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी? असे खरमरीत सवाल लोंढे यांनी उपस्थित केले आहेत.

भाजप राजकारणासाठी व सत्तेसाठी कोणत्याही थराला जाते. आता त्यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी शाळकरी मुले व शाळांचा वापर सुरु केला आहे. विद्यार्थी दशेतील या मुलांना ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपाचे राजकीय धडे गिरवायला लावणे हे या मुलांवर अन्याय करणारे आहे. अशा सरकारी कार्यक्रमात भाजपाचे नेते व पक्ष पदाधिकाऱ्यांनी शाळेत विद्यार्थ्यांसह सहभाग घेऊन भाजपाचा प्रचार व प्रसार करताना त्यांनी मुलांच्या भवितव्याचा तरी विचार करायला हवा, अशी संतप्त प्रतिक्रिया अतुल लोंढे यांनी व्यक्त केली आहे.


ते माझ्या पक्षाचे नेते नाहीत; राऊतांचा आंबेडकरांवर पलटवार