घरताज्या घडामोडीफडणवीसांचे आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’, काँग्रेसची खोचक टीका

फडणवीसांचे आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’, काँग्रेसची खोचक टीका

Subscribe

भारतीय जनता पक्षाने मागील ८ वर्षांत ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकले आहे. मविआ सरकारमधील दोन मंत्र्यांनाही अशाच पद्धतीने जेलमध्ये पाठवले. विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करुन ब्लॅकमेल करण्याचे राजकारणही भाजपानेच केले आहे. विरोधकांना राजकीय वैमनस्यातून जेलमध्ये टाकण्याची परंपरा भाजपाचीच आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

फडणवीस सरकारच्या काळात सोशल मीडियावरील प्रतिक्रिया दिल्याच्या कारणावरुनही तरुणावर पोलीस कारवाई केली होती. भारतीय जनता पक्षाने सरकारी तपास यंत्रणांना हाताशी धरून विरोधी पक्षांच्या नेत्यांचा छळ केला आहे आणि आताही ते सुरुच आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आरोप हास्यास्पद तर आहेच पण ‘चोराच्या उलट्या बोंबा’ या प्रकारातील आहे, अशी खोचक टीका अतुल लोंढे यांनी केली आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकार आपल्याला जेलमध्ये टाकणार होते या उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा समाचार घेताना अतुल लोंढे म्हणाले की, विरोधकांना राजकीय द्वेषातून जेलमध्ये पाठवण्याचे काम भाजपा सरकारने चालवलेले आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या केवळ पत्राच्या आधारे अटक करुन सव्वा वर्षे जेलमध्ये टाकले आणि ज्या परमवीरसिंग यांनी ते खोटे पत्र पाठवले त्यांच्यावर काहीच कारवाई झालेली नाही. कोर्टानेही जामीन देताना जे ताशेरे ओढले यातून हे एक षडयंत्र होते हे स्पष्ट झाले आहे. कारवाईच्या नावाखाली १०० छापे मारुन देशमुखांच्या कुटुंबियांना नाहक त्रास दिला गेला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही अशाच खोट्या प्रकरणात जेलमध्ये टाकले. माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावरही २५ वर्षांचे जुने प्रकरण उकरुन काढून त्यांना जेलमध्ये पाठवले. ही राजकीय दडपशाही भाजपानेच आणली, असं लोंढे म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काही राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग करण्यात आले. नाना पटोले यांचे नाव अजमज खान ठेवून ते अमली पदार्थ्यांचा व्यापार करतात हे दाखवून फोन टॅपिंग केले. याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना ईडी सरकारकडून क्लीट चिट देण्याचा प्रयत्न झाला पण तो कोर्टात टिकू शकला नाही. याप्रकरणातही कोर्टाने फटकारले, हे पाप फडणवीस सरकारचेच आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्यावर गंभीर आरोप करत किरीट सोमय्या यांनी अनेक पत्रकार परिषदा घेतल्या. भावना गवळी वर्षभर गायब झाल्या होत्या आणि सत्ताबदल होताच भावना गवळी थेट पंतप्रधानांना राखी बांधताना दिसल्या. भाजपाने विरोधी पक्षातील नेत्यांवर बेछुट खोटे आरोप करायचे व त्यांच्यामागे ईडी, सीबीआय लावून छळ करायचा व त्याच लोकांनी भाजपात प्रवेश केला की नंतर ते गंगेत न्हाऊन पवित्र होतात कसे? काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी जी, राहुल गांधी जी यांनाही चौकशीच्या नावाखाली ईडीच्या कार्यालयात तासनतास बसवून छळ केला तो केवळ राजकीय सुडबुद्धीतूनच. भारतीय जनता पक्षाची ही मोडस ऑपरेंडी आहे. काँग्रेस पक्षाने असे सुडाचे राजकारण केले नाही, असं लोंढे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीत एमआयएमची उडी, मविआच्या अडचणी वाढण्याची शक्यता


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -