Legislative Council by-election: विधानपरिषद पोटनिवडणूक बिनविरोध?

उमेदवारी मागे घेण्याची थोरात यांची फडणवीस यांना विनंती

congress leader balasaheb thorat met devendra fadnavis over Legislative Council by-election
Legislative Council by-election: विधानपरिषद पोटनिवडणूक बिनविरोध?

येत्या २९ नोव्हेंबरला होऊ घातलेली विधान परिषदेचे पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. भाजपने उमेदवार मागे घेऊन पोटनिवडणूक बिनविरोध करावी म्हणून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते फडणवीस यांची भेट घेतली.

विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २२ नोव्हेंबर अशी आहे. भाजपने या पोटनिवडणुकीत औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांना उमेदवारी दिली आहे. आजच्या थोरात-फडणवीस भेटीमुळे भाजप आपला अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे विधान परिषद सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसने डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे की एखादी दुःखद घटना झाल्यावर त्या पक्षाचा उमेदवार बिनविरोध दिला जातो. याबाबत आपण देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली असल्याचे बाळासाहेब थोरात  या भेटीनंतर सांगितले.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विधानपरिषद पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून आपण प्रयत्नशील असून त्यासाठी फडणवीस यांची भेट घेतल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. आता फडणवीस हे त्यांच्या पक्षातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय‍ घेतील, असेही ते म्हणाले.


हेही वाचा – ११३ नगरपंचायतींसाठी २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार