निमंत्रण नाही तर सरकार कसे स्थापन झाले? राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

राज्यपालांनी खुलासा करण्याची मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युतीला राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी लेखी निमंत्रण दिले नसल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. त्यामुळे यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करण्याऐवजी राज्यपालांनीच खुलासा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी बुधवारी केली.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रणच दिले नसल्याचे समोर आल्यानंतर फडणवीस यांनी खुलासा केला. त्याला महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले आहे. एखाद्या नेत्याला आपल्याकडे संख्याबळ आहे हे सिद्ध करण्यासाठी तसे पत्र राज्यपालांना द्यावे लागते. त्या संख्याबळाची खातरजमा केल्यानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल लेखी स्वरूपात निमंत्रण देतात, मात्र हेच निमंत्रण पत्र राजभवन कार्यालयात उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे निमंत्रण नसताना सरकार कसे स्थापन केले आणि शपथविधी कसा झाला, असा सवालही तपासे यांनी केला.

या सरकारला संविधानिक दर्जा काय आहे हे राज्यपालांनी स्पष्ट करण्याची आवश्यकता होती. १८ जानेवारीला माहिती अधिकारात ही माहिती समोर आल्यावर दोन ते तीन दिवसांत राज्यपालांनी महाराष्ट्रातून मोकळे करावे, अशी विनंती पंतप्रधानांना केली. त्यामुळे यामागे काहीतरी कनेक्शन आहे का, अशी शंका तपासे यांनी व्यक्त केली. तसेच आपल्याला तुरुंगात टाकण्याचा कट महाविकास आघाडीने रचला होता, हा फडणवीस यांचा आरोप हास्यास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत विजेच्या खांबावर लावण्यात आलेली रोषणाई राज ठाकरे यांना डान्स बारसारखी दिसत असेल तर ही शोकांतिका आहे. राज ठाकरे यांना बेस्टने वीज दरात केलेली १८ टक्के वाढ दिसली नाही किंवा ते त्यावर बोलले नाहीत. त्यावर बोलले असते तर नक्कीच आनंद झाला असता, असे सांगतानाच तपासे यांनी मुंबईला डान्स बारची उपमा देऊन राज ठाकरे यांनी मुंबईकरांचा अपमान केला असून त्यांनी मुंबईकरांची माफी मागावी, अशी मागणी केली.