मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. या महापालिका निवडणुकांमध्ये आपापल्या पक्षाकडे जास्तीत जास्त महापालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत असाव्यात यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांकडून महापालिका स्वतंत्र लढण्याकडे भर दिला जात आहे. (Congress leader manikrao thackeray first reaction on sanjay raut statement to contest the elections on his own)
नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई ते नागपूर सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याचा नारा दिला. राऊतांच्या या विधानानंतर राज्यात एकच खळबळ उडाली असून, सत्ताधारी व विरोधकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. त्यानुसार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले माणिकराव ठाकरे?
“विधानसभेला महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भात स्थानिक पातळीवर असे निर्णय होत असतात. पॉलिसी डिसीजन म्हणून एकत्र ठरवता येऊ शकतं. पण व्यक्तीगत निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे”, असे माणिकराव ठाकरे म्हणाले.
याशिवाय, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची स्थानिक पातळीवर तयारी केलेली असते. अधिकृत घोषणा केली, त्यांनी ठरवलं तर त्यांचा पक्ष आहे. ते निवडणूक लढवू शकतात. सगळ्या महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची तयारी आहे. महाविकास आघाडीने एकत्र बसून विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं” असेही माणिकराव ठाकरे म्हणाले.
संजय राऊतांचं विधान काय?
“मुंबईपासून नागपूरपर्यंत महापालिका आम्ही स्वबळावर लढणार आहोत. मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला पाहायचंच आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा – Sunil Tatkare : एकत्रितपणा किती क्षणासाठी आहे हे दिसतंय; राऊतांच्या विधानावर तटकरेंची प्रतिक्रिया