प्रेमानंद बच्छाव
Nana Patole On Mahayuti : मुंबई : राज्यात 2014 ते 2019 दरम्यानचे फडणवीस सरकार असो वा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आत्ताचे भाजपा युती सरकार असो, या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे. मलई खाण्याची स्पर्धाच तीन पक्षात सुरू आहे. केवळ एखादा मंत्री भ्रष्ट आहे असे नाही तर भाजप महायुतीचे संपूर्ण सरकारच भ्रष्ट आहे, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी केला. (congress leader nana patole criticises mahayuti government over corruption)
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना पटोले यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. भाजप युती सरकारचे मंत्रिमंडळ भ्रष्टाचारी, खुनी आहे. पण, केवळ एकाच मंत्र्यावर न बोलता सगळ्यांवरच बोलले पाहिजे. धनंजय मुंडे यांच्यावर जे गंभीर आरोप होत आहेत ते निश्चितच चिंताजनक आहेत. पण हे सर्व भाजपच करत आहे. भाजपचा आमदार खुलेआमपणे मुंडेंच्या भ्रष्टाचाराची पोलखोल दररोज करत आहे. पण मुख्यमंत्री काहीच कारवाई करत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
हेही वाचा – Education Budget : सायबर सुरक्षेसाठी क्रॅश कोर्स, शिक्षणासाठी अर्थसंकल्पात भक्कम तरतूद
भारतीय जनता पक्ष, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यातील अंतर्गत वादाचा हा परिणाम आहे का? असे विचारले असता, काँग्रेस पक्षाला त्यांच्या अंतर्गत भांडणात पडायचे नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. सोयाबीन, धान, कांदा उत्पादक शेतकरी बरबाद झाला आहे. सरकारने बांगलादेशी महिलांना लाडक्या बहिणींचे पैसे दिले आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. शिर्डीत कालच दोन हत्या करण्यात आल्या, महिला सुरक्षित नाहीत. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी विचाराच्या तरुणाची हत्या पोलिसांनी केली. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर करण्यात आला. ही सर्व गंभीर प्रकरणे सरकार लपवत आहे. पण विरोधी पक्ष म्हणून आम्ही या मुद्द्यांवर गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा – Rahul Solapurkar : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विधानावरून वाद, राहुल सोलापूरकरांनी दिले हे स्पष्टीकरण
Edited by : Ashwini A. Bhatavdekar