राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी, मिठाईच्या दुकानात सापडले निनावी पत्र

congress leader rahul gandhi gets death threat anonymous letter sweet shop in Indore bharat jodo yatra

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. भारत जोडो यात्रेनिमित्त राहुल गांधी इंदूरमध्ये येणार आहेत. परंतु राहुल गांधी इंदूरमध्ये दाखल होण्याआधीच त्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानात धमकीचे एक निनावी पत्र सापडले आहे. त्या पत्रातून राहुल गांधींना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

जुनी इंदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मिठाईच्या दुकानात हे धमकीचे पत्र मिळाले आहे. सध्या पोलीस दुकानाबाहेरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पत्र ठेवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,  जुनी इंदूरच्या भागात असलेल्या एका मिठाईच्या दुकानात अज्ञात व्यक्तीने पत्र ठेवले होते. हा प्रकार दुकानमालकाने पाहिल्यानंतर त्याने हे पत्र पोलिसांच्या हवाली केले. या पत्रात राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान इंदूरच्या खालसा कॉलेजमध्ये थांबल्यास त्यांना बॉम्बस्फोट घडवून उडवून देण्याची धमकी दिली आहे.

इंटेलिजन्सचे डीसीपी रजत सकलेचा यांनीही धमकीचे पत्र मिळाल्याचं सांगितलं आहे. ते पत्र उज्जैनमधून आल्याचे सांगितले जात आहे. किंबहुना या पत्रात एका आमदाराच्या नावाचाही उल्लेख आहे.


हेही वाचाः इस्त्रोने रचला इतिहास, पहिल्या खासगी रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण