मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. अशामध्ये आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सत्ताधाऱ्यांवर गम्भी आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी पोलीस दलाच्या माध्यमातून रसद पुरवून मतदारांना प्रभावीत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करून निष्पक्षता जपावी, अशी विनंती त्यांनी केली. (Congress leader Ramesh chennithala accuses ruling party misusing police demand fair election)
हेही वाचा : Sindkhed Raja : महायुतीत तिढा… राष्ट्रावादीच्या पाठिंब्याचे पत्र; अजित पवार गटाने दिले असे स्पष्टीकरण
रमेश चेन्नीथला म्हणाले की, “20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीचा प्रचार सोमवारी (18 नोव्हेंबर) संपत आहे. पण पराभव समोर दिसत असल्याने सत्ताधारी पक्षांकडून सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी काँग्रेस पक्षाकडे येत आहेत. यात सर्वात जास्त पोलीस दलाचा वापर केला जात आहे. अत्यंत निष्पक्ष निवडणुका आणि लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची तात्काळ दखल घेऊन हस्तक्षेप करावा,” अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे. या संदर्भात बोलताना चेन्नीथला म्हणाले की, “पोलीस दलाकडून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप होत असल्याचे काँग्रेस पक्षाने सातत्याने निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर या संदर्भातील लेखी तक्रारी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली. काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवण्याची मागणी केली होती.” असे म्हणत त्यांनी रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणावर भाष्य केले.
रमेश चेन्नीथला म्हणाले की, “पक्षाची मागणी लक्षातच घेऊन निष्पक्ष निवडणुका पार पडाव्यात म्हणून आयोगाने रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करून संजयकुमार वर्मा यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली. त्यानंतरही राज्य सरकार तसेच सत्ताधारी पक्षातील बडे नेते पोलिसांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात निवडणूक प्रभावीत करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे आमच्या निदर्शनास आले. हे लोकशाहीसाठी योग्य नाही.” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “काँग्रेस पक्ष या संदर्भात निवडणूक आयोग आणि मुख्य सचिवांकडे लेखी तक्रार करणार आहेच. पण आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन निष्पक्ष तसेच पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी हस्तक्षेप करावा,” अशी मागणी यावेळी रमेश चेन्नीथला यांनी केली.