काँग्रेस नेते सुभाष वानखेडेंचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंच्या बंडानंतर मराठवाड्यात सेनेला बळ

SHUBHASH_ WANKHEDE

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. जवळपास 40 आमदारांनंतर लोकसभेतील12 खासदारसुद्धा उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेगटात दाखल झाले. मात्र, मराठवाड्यात शिवसेनेला मोठे बळ मिळाले आहे. हिंगोलीत माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे.

एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे हिंगोलीतील जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर यांनी शिंदेगटात प्रवेश केला. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हेही शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पक्षाला खिंडार पडले. अशा स्थितीत सुभाष वानखेडे यांच्या रूपात एक अनुभवी नेते पक्षात दाखल झाले आहेत.

2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुभाष वानखेडे यांनी शिवसेनेची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती.१९९५ मध्ये पहिल्यांदा आमदार बनलेल्या सुभाष वानखेडे यांनी तीन वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केल्यानंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तत्कालीन मंत्री सूर्यकांता पाटील यांचा पराभव केला होता. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकी मोदी लाटेमध्येही त्यांना विजय मिळवला आला नव्हता. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांनी सुभाष वानखेडे यांचा अवघ्या दीड हजार मतांनी पराभव केला होता. दरम्यान, राज्यातील आणि जिल्ह्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सुभाष वानखेडे यांनी आज अखेर आपल्या कार्यकर्त्यांसह पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला आहे.